प्रज्ञा पवार यांनी राज्य सरकारचे पुरस्कार परत केले

0
9

मुंबई दि. १३:- ज्या देशात बुद्धिवाद्यांचे खून होतात, धर्मांध जमाव मोकाट सुटतो त्या देशात जगायचे कसे असा सवाल देशातील बुद्धिजीवी विचारत असताना, मराठीतील ज्येष्ठ लेखिका आणि कवियत्री प्रज्ञा दया पवार यांनी या अघोषित आणीबाणीविरोधात ठोस भूमिका घेत राज्य शासनाचे सर्व पुरस्कार त्यांच्या रकमेसह परत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रज्ञा पवार यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ समीक्षक हरिश्चंद्र थोरात आणि प्रसिद्ध साहित्यिक गणेश विसपुते यांनीही शासनाचे पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या शिवाय पंजाबमधील प्रसिद्ध साहित्यिक दिलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री पुरस्‍कार परत करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
पवार यांनी पुरस्कारात मिळालेले १ लाख १३ हजार रुपयेदेखील परत करणार असल्याचे म्हटले आहे. दादरीतील घटनेनंतर सध्या देशभरातील २० हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहे. यात आता मराठी साहित्यिकांचाही समावेश झाला आहे. कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारचे पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले आहे.
पंजाबमधील प्रसिद्ध साहित्यिक दिलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री पुरस्‍कार परत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्‍या काळात देशामध्‍ये अभिव्‍यक्‍त स्‍वातंत्र्य राहिले नाही. लेखकांवर हल्‍ले होत आहेत. दादरीसारख्‍या घटनांना प्रोत्‍साहन मिळत आहे. त्‍यामुळे याचा निषेध म्‍हणून त्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. मागील तीन दिवसांत पुरस्‍कार परत करणाऱ्या त्‍या 15 व्‍या साहित्यिक आहेत.