लेखी आश्‍वासनानंतर गुरूजींचे उपोषण मागे

0
11

गोंदिया दि.२५: तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसर्‍याचे दिवशी शुक्रवारी (दि.२३) आपले उपोशम मागे घेतले. बांधतलावात गैरकायदेशीररित्या करण्यात आलेले एन.ए. रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागील १0 वर्षापासून अडगळीत पडलेले प्रकरण आता मार्गी लागण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.
शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावातील भुखंडाचे अवैधरित्या झालेले अकृषक आदेश रद्द करणे व तलाव जागेवर अवैधरित्या तयार केलेली पाळ पाडण्यात यावी याकरिता सेवनवृत्त मुख्याध्यापक डी.एस. सूर्यवंशी यांनी गुरूवारपासून (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना शेकडो पत्र व भेटी देवून अर्ज विनंत्या केल्या. तहसील कार्यालयापासून विभागीय आयुक्तांपर्यंत आपल्या मागणीसाठी चकरा त्यांनी मारल्या होत्या. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांनी त्यांची दखल घेवून जिल्हाधिकार्‍यांना वारंवार पत्र देवून हे प्रकरण तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही दिले होते.
परंतु कुंभकर्णी निद्रेत असलेल्या प्रशासनाला जागच येत नव्हती. उलट उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडून त्यांना अपमानित ही करण्यात आले व हाकलून देण्यात आल्याचेही प्रकार घडले. मात्र बांधतलावाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्धार धरून त्यांनी विजयादशमीच्या दिवसापासून (दि.२२) उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला विविध संघटना व जनतेचा सतत पाठिंबा लाभत असल्याचे पाहून कुंभकर्णी झोपेतून प्रशासन खडबडून जागे झाले. परिणामी उपोषणाच्या दुसर्‍याच दिवशी शुकवारी (दि.२३) पविभागीय अधिकारी के.एन.के. राव व तहसीलदार संजय पवार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार एस.बी. माळी यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.
जिल्हाभर ही बातमी पसरल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन संबंधीत प्रशासकीय अधिकार्‍यांशी दुरध्वनीवर चर्चा करुन उपोषणाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्याचप्रकारे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांशी परस्पर दुरध्वनीवर चर्चा करुन या आंदोलनामुळे होणार्‍या गंभीर परिणामाला प्रशासनास सामोरे जावे लागेल असे समजावून दिले. लोकांचा वाढता पाठींबा बघता प्रशासन नमले व सायंकाळी ३ महिन्याच्या आत या प्रकरणावर निर्णय घेवून निकाली काढण्याचे लेखी पत्र देवून नायब तहसीलदार माळी पुन्हा दुसर्‍यांदा उपोषण मंडपात दाखल झाले व उपोषण संपविण्याचा आग्रह केला.
लेखी आश्‍वासन हाती आल्याने बांधतलाव जिर्णोद्धार समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या सल्यावरून रात्री ९ वाजता गुरूजींनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले. या आंदोलनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आशिष नागपुरे, फुलचूरचे ग्रामपंचायत सदस्य मुकेश लिल्हारे, पुरुषोत्तम मोदी, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव अमर वराडे यांच्यासह बांधतलाव जिर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला, राजकीय पुढारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले.