मेहकर चिखली मार्गावर‘लक्झरी’ व एसटीच्या धडकेत महिला ठार, २५ जखमी

0
7

बुलढाणा: खाजगी बसने (ट्रॅव्हल) महामंडळाच्या एसटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. मेहकर चिखली मार्गावर आज रविवारी( दि ४) ही दुर्घटना घडली.राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा ते अहमदपूर बस ( एम.एच २० बीएल २३७७) आज बुलढाणा आगारातून रवाना झाली. दरम्यान मेहकर चिखली मार्गावर धावणाऱ्या एसटीला मागून भरधाव वेगाने येणारी एक लक्झरी बस धडकली. यामुळे अंजली गोपाल शर्मा ( २६, चिखली जिल्हा बुलढाणा) या महिलेचा मृत्यू झाला. २५ प्रवासी जखमी झाले आहेत. महामंडळाचे राहुल देशमाने, समाधान जुमडे, प्रविण तांगडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मेहकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रमेश बाजड, हवालदार शिवानंद केदार हे देखील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.