गोंदियात केमिकल तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग

0
16

गोंदिया : आज ४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत असून योगायोगाने आजच्याच दिवशी फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना (दि. ४) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून याठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी फूल तोडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना कंपनीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती त्यांनी बजाज यांना दिली त्यांनी कंपनीकडे धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात एक युवकही किरकोळ भाजल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे चार बंब व पोलीस पथकाने घटनास्थळावर दाखल होत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.