शेतकर्‍यांचे बेमुदत आंदोलन;टॉवर लाईनचा मोबदला देण्याची मागणी

0
26

ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी, नागभीड, अर्‍हेर नवरगाव, नांदगाव, नान्होरी कलेता, तोरगाव, मौशी आदी गावातील टॉवरग्रस्त शेतकरी ऑवर लाईनचा मोबदला न मिळाल्याने उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील शेतशिवारातून रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची 765 केव्ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी ब्रम्हपुरी तालुक्यातील लाळज, पिंपळगाव, अर्‍हेर नवरगाव, नांदगाव, नान्होरी, कलेता, तोरगाव तर नागभीड तालुक्यातील मौशी, विलम, मोहाडी, बामणी, मांगली, तेलिमेडा, बलापूर येथे टॉवर उभारणीपूर्वी टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र, टॉवर उभारून लाईन सुरू होईन तीन वर्षे होवूनसुद्धा शेतकर्‍यांना मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातून रायपूर, राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची विद्युत वाहिनी गेली असून, टॉवर लाईनच्या परिसरात काम करणे धोक्याचे असल्याने शेतकर्‍यांना जीव मुठीत धरून शेतकाम करावे लागत आहे. पण कंपनीने निर्धारित केलेला मोबदला मागील तीन वर्षांपासून अद्यापही टॉवर लाईनग्रस्त शेतकर्‍यांपर्यंत पोहचविला नाही. टॉवर लाईनग्रस्त शेतकर्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना व राजकीय नेत्यांना निवेदनाव्दारे मदतीचा हात मागितला. पण, त्यांनी केराची टोपली दाखविली असल्याने त्रस्त शेतकर्‍यांनी रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीविरोधात तत्काळ मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.