पुसद नपतील दोन दिग्गज नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार ?

0
35

पुसद-नगर परिषदेतील दोन दिग्गज नगरसेवकांनी संस्थेच्या माध्यमातून शासकीय जागेवर अतिक‘मण करून शाळेची इमारत उभी केली आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम पाडावे याकरिता नप कार्यालयासमोर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुधाकर चापके यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी दखल घेऊन संबंधित अतिक‘मणाविरोधात पवित्रा घेत हे अवैध बांधकाम पाडण्याची तसेच दोन्ही नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव संबंधित प्रशासनाकडे सादर केल्यामुळे पुसद परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
नवजीवन इंग्लिश मिडीयम शाळेचे अवैध बांधकाम झाल्याची तक्रार सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुधाकर चापके यांनी 2010 मध्ये पुसद नगर परिषदेकडे केली होती. सतत 11 वर्षांपासून पाठपुरावा केला. अखेर चापके यांनी हे अवैध बांधकाम पाडण्यासाठी व दोषींवर कार्यवाहीसह विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्टपासून नप कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
त्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात शाळेचे बांधकाम 18 मिटर रस्त्यावर व विनापरवाना असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी नप पुसद यांनी कार्यालयाने 18 ऑगस्ट रोजी संबंधितांना सूचनापत्र बजावले आहे. पुढील कारवाई करण्यासाठी तक‘ार करता सुधाकर चापके बेमुदत उपोषणाला बसल्याबाबत अहवाल मु‘याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवला आहे. या अहवालात शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील दोन सदस्य डॉ. अकील मेमन व डॉ. महंमद नदीम नगर परिषदेचे सदस्य असल्याचे सांगितले आहे. तसेच उपोषणकर्त्याच्या तक‘ारीनुसार या नगरसेवकांचे सदस्यपद रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम काढून टाका
अध्यक्ष नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ पुसद यांना तळमजला व पहिला मजला बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु चापके यांच्या तक‘ारीच्या आधारे बांधकाम परवानगीपेक्षा जास्त केल्याचे दिसून आल्याने ते 7 दिवसांच्या आत काढून टाकण्यात यावे, असे न झाल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 52 व 53 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पत्र मु‘याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी 18 ऑगस्ट रोजी नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षांना देऊन उपोषणकर्ता सुधाकर चापके यांचे बेमुदत उपोषण सोडवले.