जिल्हाधिकारी सिंगलांच्या नियोजन कौशल्यातून कोरोना आटोक्यात

0
31

निरोप समारंभ कार्यक्रमात अधिकारी वर्गाचे प्रतिपादन

गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी संजय मीना रूजू

गडचिरोली, दि.23, : गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने आज छोटासा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सर्वच अधिकारी वर्गाने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांच्या कारकिर्दीमधील कामाबाबत आठवणी काढून त्यांचे आभार मानले. कोविड काळात सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा समन्वय साधून त्यांनी त्यांच्या नियोजन कौशल्यातून कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, असे प्रतिपादन बहुतेक सर्वच अधिकारी वर्गाने केले. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागतही प्रशासनाकडून करण्यात आले.

निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दीपक सिंगला यांचा सन्मान केला. त्यांना शाल व श्रीफळ देवून त्यांनी केलेल्या जिल्हयातील विविध कामांबाबत आभार व्यक्त केले. यावेळी संजय मीना यांनी शेखर सिंह, दिपक सिंगला यांनी सुरू केलेल्या विकासात्मक कामांना आपणही पुढे नेणार असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, प्रकल्प अधिकारी श्री अंकित, प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, अति.जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, गंगाराम तळपाडे, कल्पाना ठुबे, विजया जाधव, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी जिल्हयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, गडचिरोलीमध्ये कोविड दरम्यान सर्वांनी चांगले काम केले. यातून जिल्हयाची ताकद सर्व जगाला कळाली. जिल्हा भलेही विकासात थोडा मागे असेल पण कोविड रोखण्यासाठी जे सर्वांनी कार्य केले ते मी इतर ठिकाणी कुठे पाहिले नाही. आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणेनी अतिशय चांगले कार्य केले. यामुळे संपुर्ण विदर्भातून आपल्याकडे कोरोना रूग्ण उपचारासाठी येत होते. दुर्गम भागातील रस्ते व पुल तसेच आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी माझ्या कालावधीत मी प्रयत्न केला. त्यामूळे भविष्यात नक्कीच त्याचा फायदा तेथील स्थानिकांना होईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दहीकर यांनी केले तर आभार तहसिलदार कल्याणकुमार दाहट यांनी केले.