वर्ध्यातील 130 शासकीय कार्यालयावर 35 लाख वीज देयक थकीत

0
14

वर्धा-  सामान्य नागरिकांचे एक महिन्यांचे वीज देयक थकीत झाल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या मार्फत तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्याचा सापाटा लावला जातो. दुसरीकडे मात्र 5 महिन्यांपासून वर्ध्यातील 130 शासकीय कार्यालयाकडे 34 लाख 88 हजार रुपये वीज देयक थकीत आहेत. दरम्यान, वर्ध्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलचा वीज पुरवठा खंडीत करण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीतर्फे सूचना देण्यात आली. विशेष म्हणजे याच परिसरात पहिल्या माळ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील 131 शासकीय कार्यालयांमधील सर्वात जास्त वीज देयक वर्धा तहसीलकडे 8 लाख 22 हजार 778, तुरुंग अधिकारी कार्यालय 3 लाख 97 हजार 463, उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्धा 3 लाख 33 हजार 490, उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 2 लाख 70 हजार 522, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी 1 लाख 20 हजार 291, शासकीय मुलांचे निवासी वसतीगृह 1 लाख 20 हजार 187, पोलिस अधीक्षक कार्यालय 91 हजार 836, पोलिस स्टेशन वर्धा 78 हजार 800, जिल्हा हिवताप अधिकारी 78 हजार 780, जिल्हा आरोग्य अधिकारी 63 हजार 239, कार्यकारी अभियंता सांबावी 58 हजार 993 एवढी मोठी रक्कम थकीत आहे.
तर जिल्हा कोषागार अधिकारी 5 हजार 956, जिल्हा आरोग्य अधिकारी 5 हजार 637, तालुका कृषी अधिकारी 5 हजार 261, विशेष भूसंपादन अधिकारी 1 हजार 912, नगर परिषद वर्धा 2 हजार 229, जिल्हा उपनिबंधक 2 हजार 386, स्थानिक गुन्हे शाखा 3 हजार 134, जिल्हा उद्योगिक अधिकारी 3 हजार 510, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग 7 हजार 172, तालुका भूमिअभिलेख अधीक्षक 1 हजार 783 या किरकोळ रकमेसह 14 अंगणवाड्या, जिपच्या तीन शाळांकडे वीज देयक मार्च महिन्यापासून थकीत आहेत. तर जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा शिक्षण वव प्रशिक्षण संस्था, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, तहसीलदार वर्धा, उपविभागीय अभियंता जिप, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे फेब्रुवारी 2020 पासून वीज देयक थकीत आहेत. गेल्या महिन्यात ग्रापंचा पाणी व पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्याविरोधात सरपंचांनी जिपच्या मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे दाद मागितली होती. शासकीय कार्यालयांवर मात्र अद्याप अशी कारवाही झाली नाही.

देयक भरण्यासाठी निधी नाही : उपविभागीय अधिकारी बगळे
उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत करण्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की काही महिन्यांपूर्वी आम्ही 2 लाख रुपये वीज देयकाची रक्कम भरली होती. आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आमच्याकडे निधी नसल्याचे सांगितले.