फिनले मिलबरोबरच मोझरी- बहिरम महामार्ग, चिखलदरा स्कायवॉकचे काम मार्गी लागणार

0
23

अमरावती, दि. 2 :  अचलपूर येथील फिनले मिल सुरू होण्यासह मोझरी- बहिरम या सुमारे 150 कोटी रूपयांच्या महामार्गाचे व चिखलदरा स्कायवॉकचे काम लवकरच मार्गी लागणार असून, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती जलसंपदा, कामगार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले, तसेच या विषयांवर चर्चाही केली. फिनले मिल त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, बैतुल- अकोला राष्ट्रीय महामार्ग व नागपूर- अमरावती महामार्ग जोडल्यास जिल्ह्यातील महत्वाची स्थळे जोडली जातील, अशी मागणी राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यानुसार सुमारे 150 कोटी रूपयांच्या मोझरी- बहिरम महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली.

बैतुल- अकोला महामार्गावर स्थित बहिरम हे तीर्थक्षेत्र यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील माधान ही संत गुलाबराव महाराज यांची जन्मभूमी, तसेच मोझरी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ नागपूर- अमरावती महामार्गावर स्थित आहे. ही महत्वाची स्थळे जोडण्यासाठी बैतुल- अकोला राष्ट्रीय महामार्ग व नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गासह बहिरम, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, चांदूर बाजार, माधान, बेलोरा, राजुरा, मोझरी या सुमारे 50 किमीच्या नवीन महामार्गाला मान्यता द्यावी, असे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले. या महामार्गाचे काम सुरू होण्यासाठी मान्यता व निधी प्रदान करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यंत्रणेला दिले.

चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम रखडलेले आहे. पर्यटनात वाढ होण्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, केंद्रीय वन विभागाद्वारे काही परवानग्या मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक मान्यता मिळवून देण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी केली. त्यानुसार याबाबत आवश्यक मान्यता लवकरात लवकर प्रदान करण्यात येतील. परवानगीची प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासनाला दिले. फिनले मिल सुरु होण्याबाबतही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. जिल्ह्यातील ही महत्वाची कामे मार्गी लागणार असल्याने विकासप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.