यवतमाळ ‘मिनी मंत्रालयात’ सभेपूर्वीच राडा;अधिकार्‍यांची खुर्ची आणली आवारात

0
25

यवतमाळ-नियोजन समितीचा निधी दारव्हा व दिग्रस तालुक्यांतच जास्त प्रमाणात वळता करून, इतर मतदारसंघांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तसुद्धा अद्याप दिले नसल्याचा आरोप करत माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल व माजी बांधकाम सभापती निमिष मानकर यांनी गुरुवार, 2 सप्टेंबर रोजी उपमु‘य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे यांची खुर्ची उचलून चक्क जिल्हा परिषदेच्या आवारात आणून प्रशासनाचा निषेध केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता शासनाने नियम लागू केले होते. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी झाल्याने हे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे जिपची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांमधून होत आहे. मात्र सत्ताधार्‍यांकडून नियम सांगून ही सभा आभासी पद्धतीनेच घ्यावी लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या सभेची नोटीस नियमाने पंधरा दिवसांपूर्वी सदस्यांना मिळणे अपेक्षित आहे. असे असताना सामान्य प्रशासन विभागाकडून सदस्यांना अद्यापही सभेची नोटीस देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सभेचे इतिवृत्तसुद्धा देण्यात आलेले नाही.

त्यामुळे श्याम जयस्वाल व निमिष मानकर सभेचे इतिवृत्त मिळावे याकरिता गुरुवारी उपमु‘य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे त्यांच्या कक्षात गेले असता, ‘मला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आहे’, असे सांगून गुडधे आपल्या कक्षातून निघून गेले. त्यामुळे आक‘मक सदस्यांनी त्यांची खुर्चीच जिपच्या आवारात आणून त्यांचा निषेध केला. सदस्यांच्या या आंदोलनामुळे चांगलाच राडा झाला असून, सर्वसाधारण सभेपूर्वीच जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापले आहे.
आभासी सभा झाल्यास घंटानाद आंदोलन
होऊ घातलेली सर्वसाधारण सभा ही आभासी पद्धतीने न घेता सभागृहात घेण्यात यावी. जेणेकरून सदस्यांना आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांना न्याय देता येईल. सभा घेताना शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ही सभा घेण्यात यावी, अन्यथा घंटानाद आंदोलन करू, असे श्याम जयस्वाल व निमिष मानकर यांनी सांगितले.