लोंबकळलेल्या वीज तारांचे मृत्यूला आमंत्रण

0
32

गोंदिया-तालुक्यातील गुदमा, हेटीटोला, जनाटोला गावात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने येथील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज विभागाच्या नाकर्तेपणामुळे विजेच्या खांबावरील तारा खाली लोंबकळत असल्याने येथे मोठी हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत विभागाने याकडे लक्ष देऊन वरील गावांत सुरळीत वीज पुरवठा करावा, लोंबकळत असलेले वीज तारांची दुरूस्ती करावी, अशी मागणी फिरोज बनसोड व गावकर्‍यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 200 युनिट पर्यंतची वीज माफ करण्याचे आश्वासनही दिले होते, परंतु ते आपल्या आश्वासनांपासून दूर गेले आहे. तसेच वीज विभाग एकीकडे वीज बिले न भरल्यामुळे वीज जोडण्या विनाविलंब कापल्या जात आहेत. ही हुकूमशाही आहे. त्यातच गुदमा, हेटीटोला, जनाटोला गावात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने येथील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठ्यामुळे गावात पाण्याची समस्या, मोबाईलमध्ये पुरेसे चार्जिंग नसल्यामुळे आभासी वर्गात शिकणार्‍या मुलांचे होणारे नुकसान, दुकानदार व खासगी कार्यालयांना बसणारा फटका अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत असल्याने नेहमीच जीविताची भीती राहते. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वीज विभागाला कळवले. परंतु आजपर्यंत वीज विभागाच्या एकाही अधिकार्‍याने ही समस्या सोडवण्यासाठी हस्तक्षेप केलेला नाही. या समस्या त्वरीत निकाली न निघाल्यास वीज विभागाच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आसोली जिल्हा परिषदेचे जिल्हाप्रमुख फिरोज बनसोड व ग्रामस्थांनी दिला आहे.