मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

0
20
  • गणेशोत्सव मंडळांनी लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करावे
  • एक गाव-एक गणपती उपक्रम राबविण्याचे आवाहन
  • श्रीगणेश आगमन, विसर्जन मिरवणुकांना मनाई

वाशिम, दि. ०३  : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाने २९ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. गणेशोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज, ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या संबंधित अधिकारी व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, राहुल जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये एक गाव, एक गणपती तसेच शहरी भागामध्ये एक वार्ड, एक गणपती यासारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. यंदाही गणेश आगमन व गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक मंडळाने अथवा घरगुती गणपतीच्या आगमाना प्रसंगी मिरवणूक आयोजित करू नये. उत्सव काळात मंडपामध्ये अथवा मंडप परिसरात गर्दी होवू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी संबंधित मंडळाने घ्यावी. मंडप उभारतांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी

कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जनजागृती करावी. मंडळांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबिरे, कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजन करून १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी तसेच कोरोना चाचण्यांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी केले.

नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा : पोलीस अधीक्षक श्री. परदेशी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेऊनच मंडप उभारणी करावी. डीजे, लाउडस्पीकरचा वापर टाळावा. आरती, पूजेच्या वेळी मंडपामध्ये गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित मंडळाची राहणार आहे. मंडप परिसरात नियमांचे उल्लंघन होवू नये, तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. शासन तसेच स्थानिक स्तरावरून देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी यावेळी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, सार्वजनिक मंडळाकरीता श्रीगणेशाची मुर्ती ४ फुट व घरगुती गणपतीकरीता २ फुट उंचीची असावी. शक्यतो रस्त्यावर मंडप उभारू नये, मंडपाचे तोंड रस्त्याकडे करू नये. तसेच जास्तीत जास्त १५० चौरस फुट जागेतच मंडप उभारावा. यावर्षी शक्यतो पारंपारीक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन द्यावी. तसेच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई असून गणेश विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाकडून गतवर्षीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.