मोरवाही येथील आंदोलनाला समाजकंटकांकडून गालबोट,प्रशासनाच्या मुस्तदीमुळे टळले अनर्थ

0
143

गोंदिया,ता.7ःतालुक्यातील मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांचे बुद्धविहाराच्या मागणीसाठी मागच्या 12 ऑगस्ट पासून धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतानाच सोमवारी(ता.6)रात्री येथील काही समाजकंटकांनी धरणे आंदोलन मंडपावर हल्ला करीत नासधूस केली.परंतु पोलीस विभागाने चोख बंदोबस्त लावून गावगुंडांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यातच मंगळवारी(ता.7) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे हजेरी लावित कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे तुर्तास पंचवीस दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन समितीतर्फे मागे घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
मागच्या 25 दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिनी व्यक्तींनी आंदोलनस्थळी गणपती बसविण्याचे कारण पुढे करून आंदोलनकर्त्यांशी वादाला सुरुवात केली. त्यातच सोमवारी पोळ्याच्या रात्री गैर कायद्याची जवळपास शे-दोनशे मंडळी जमवून त्यांनी आंदोलन मंडप उधळून लावण्याचा प्रयत्न केला. समाजकंटक एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करीत सरपंच राधेश्याम भिमटे यांना मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. मात्र पुढे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी संयमाची भूमिका घेत समाजकंटकांना पळवून लावले. त्यातच सदर प्रकरण पुढे वाढू नये व समाजात जातीय तिढा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी मंगळवारी(ता.7) जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. यात जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गटविकास अधिकारी दिलीप खोटोले, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खोब्रागडे, व स्वतः पोलीस अधीक्षक उपस्थित झाले, यादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन दिवसात दोषी असलेल्या सर्व अधिकार्‍यांवर ,ग्रामपंचायत प्रशासनावर, व तिन्ही कंत्राटदारांवर कारवाईचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासना नंतर येथील बौद्ध समाज बांधवांनी तुर्तास आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान एवढी मोठी घटना घडूनही येथील ग्रामसेवक ललित सोनवणे हे बेपत्ता असल्याने त्यांच्या कार्यशैलीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला.