ओबीसी सेवा संघ लाखांदूरच्यावतीने 14 सप्टेंबरला जातीनिहाय जनगणनेसाठी आंदोलन

0
26

लाखांदूर,दि.11ः-ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी, ओबीसी सेवा संघ व ओबीसी जनगणना परिषद लाखांदूरच्या वतीने लाखांदूर येथे 14 सप्टेंबर 2021 ला दुपारी 1 वाजता टी पॉईंट लाखांदूर येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेच्या लेखी प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी ओबीसिंची जातीनिहाय जनगणना 2021च्या जनगनणेत होणार नाही असे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेले ओबीसी आरक्षण नुकतेच सुप्रीम कोर्टाने रद्द केले, जोपर्यंत ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकार जमा करणार नाही तोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे भारतातील जवळपास 52000 राजकीय पदाचे जि.प.,पंस, ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगर पालिका येथील आरक्षण संपुष्टात आलेली आहेत.
मंडळ आयोगाच्या शिफारशी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांनी स्विकारल्या, मंडळ आयोगाने संपूर्ण मागास जातीचा अभ्यास करून 1931 च्या जनगणणे प्रमाणे 52 टक्के असलेल्या ओबीसीना 52 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. परंतु 1990 ला केंद्र सरकारने 27 टक्के शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण दिले.आणि 1994 पासून महाराष्ट्रत राजकीय आरक्षण देण्यात आले. परंतु तेव्हापासून आजपर्यंत ओबीसीची जनगणना झालीच नाही. त्यामुळे ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी लाखांदूर येथे ओबीसी सेवा संघ व ओबीसी जनगणना परिषद लाखांदूर यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघ व परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.