Home विदर्भ जिल्हाधिकार्‍यांनी घेतला ऑक्सिजन जनरेशन प्लांट कामाचा आढावा

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला ऑक्सिजन जनरेशन प्लांट कामाचा आढावा

0

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील ताप क्लिनिकला भेट

तिरोडा, दि.11 : तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 200 लीटर प्रती मिनिट क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारला जात आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज शनिवार, 11 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

जिल्हाधिकारी गुंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील ताप क्लिनिकला देखील भेट दिली. या क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच 08 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या वेळी त्यांनी इको-फ्रेंडली फीवर क्लिनिकबद्दल समाधान व्यक्त केले. हे क्लिनिक क्रॉस इन्फेक्शनला प्रतिबंध करते. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोविड नसलेल्या रुग्णांना सुरक्षा प्रदान करते, इन्फ्लूएन्झासारखे इन्फेक्शन आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमित रुग्णांचीही कोविडसाठी याच ठिकाणी चाचणी करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन जनरेशन प्लांट लवकर पूर्ण करण्याचे आदेश

ऑक्सिजन जनरेशन प्लांट
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे स्वागत करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम

या वेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट संबंधित काम लवकर पूर्ण करावे, असे सिव्हिल वर्क कंत्राटदाराला सांगितले. एमएसईबीचे अभियंता पंकज मेश्राम यांना ट्रान्सफॉर्मर स्थापित करण्यासाठी आणि पीएसए प्लांटला विद्युत पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. तसेच प्रभारी सिव्हिल सर्जन डॉ.प्रशांत तुरकर यांना पीएसए प्लांटपासून मॅनिफोल्डपर्यंत ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

पीएसए प्लांट 24 तास राहणार सुरू  

पीडब्ल्यूडी अभियंत्यांच्या मदतीने समर्पित कोविड आरोग्य केंद्रात, पीएसए प्लांटला ब्रेकडाउन दरम्यान वीज पुरवठा करण्यासाठी जनरेटर उपलब्ध करून द्यावे. पीएसए प्लांट 24 तास चालवण्यासाठी 4 तांत्रिक कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. तसेच सदर प्लांट 30 सप्टेंबर 2021 पूर्वी सुरू करण्याचेही जिल्हाधिकारी गुंडे यांनी निर्देश दिले.

मॉड्यूलर मेडिसिन स्टोअरसाठी निधी उपलब्ध करून देणार

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील सध्याच्या औषधी भांडारात योग्य व पुरेशी जागा नाही. त्यामुळे औषधी सुरक्षितपणे साठविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. ही बाब वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी जिल्हाधिकारी गुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लागणारी रसद आणि औषधे ठेवण्यासाठी मॉड्यूलर मेडिसिन स्टोअरच्या बांधकामासाठी डीपीडीसीकडून निधी उपलब्ध करून देणार, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.सुरूवातीला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे स्वागत केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाबाबत संपूर्ण माहिती प्रदान केली. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हाधिकारी गुंडे यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णायलयातील कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच येथील ताप क्लिनिक सेंटरचे कौतुक केले. याच धर्तीवर इतर ग्रामीण रुग्णालयातदेखील ताप क्लिनिक सेंटर उघडण्याचे निर्देश प्रभारी शल्य चिकित्सक प्रशांत तुरकर यांना दिले. या वेळी रुग्णालयाचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Exit mobile version