२६ किंवा २७ ला होणार नगरपंचायत अध्यक्षाची निव़़ड

0
8

.

गोंदिया दि.दि.१८: जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नाही. त्यामुळे कोणती नगर पंचायत कोण काबीज करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २६ किंवा २७ नोव्हेंबरला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘अ’ वर्ग नगर पालिकेला लागू असलेले सर्व नियम या क वर्ग नगर पंचायतींना लागू राहणार आहेत. त्यामुळे सुरूवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केल्यानंतर दुसर्‍या सभेत विषय समित्यांच्या सभापतींची आणि नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे चारही नगरपंचायतमध्ये संख्याबळावर काही मात्तबर पुन्हा नामनिर्देशीत सदस्य म्हणून जाऊ शकतात.

चारही नगर पंचायतीत प्रत्येकी १७ सदस्य नागरिकांनी निवडले असले तरी त्यात आणखी २-२ सदस्यांची भर पडणार आहे. हे सदस्य नामनिर्देशित सदस्य असतील.गोरेगावमध्ये काँग्रेसकडून जगदिश येरोला यांना पुन्हा संधी मिळू शकते.
चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिला सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. त्यात अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती महिला, सडक अर्जुनी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), देवरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोरेगावात खुल्या प्रवर्गातील महिला नगर पंचायत अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोणत्याही दोन किंवा तीन पक्षांना एकत्रित येऊनच सत्ता मिळवावी लागणार आहे. यात सर्वच ठिकाणी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

गोरेगाव येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावतीने भाजपसोबत युतीला विरोध असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेससोबत जायला लक्ष्मीकांत बारेवार यांचा गट तयार असल्याने काँग्रेसकडे अध्यक्ष  तर बारेवार गटाकडे उपाध्यक्ष पद जाऊ शकते.परंतु स्थानिक नेते बारेवार यांच्यापेक्षा भाजपशी युती करण्यास उत्सुक असून माजी आमदार हेमंत पटले यांच्या निवासस्थानी दोन दिवसापुर्वी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची बैठक सुध्दा पार पडली आहे.ज्या पक्षाचे अध्यक्ष त्या पक्षाची सत्ता त्या नगरपंचायत मध्ये गणली जाणार त्यामुळे काँग्रेस आपली सत्ता दाखविण्यासाठी गोरेगावात बारेवार गटासाेबत गेल्यास राज्यातील सत्ताधारी भाजपला एकही नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यास यश मिळणार नाही.अर्जुनी मोरगाव मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद निश्चित झाले आहे,देवरीत राष्ट्रवादी निश्चित मानले जात आहे.