प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे- अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले

0
20
गोंदिया,दि.20 : कार्यालयीन कामकाज करतांना कर्मचाऱ्यांना अनेक
अडचणी उदभवतात. त्यामुळे चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा
चुका टाळण्यासाठी तसेच कामात पारदर्शकता येण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे
आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.

18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती
सभागृहात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाजाबाबत एक
दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी कर्मचाऱ्यांना
मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सालेकसा उपविभागीय अधिकारी
विश्वास सिरसाट, प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) लिना फलके, जिल्हा
कोषागार अधिकारी एल.एच.बाविस्कर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रभारी
अधिक्षक संजय धार्मिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी राजेश खवले यांनी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाज करतांना
अडचणी येऊ नयेत व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी उपस्थित
कर्मचाऱ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जमीन महसूल संहिता, जमीन
महसूल नियम व महसूल निरीक्षक नियम याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. सर्व
कर्मचाऱ्यांना पुस्तके वाचण्याचा छंद असायला पाहिजे, जेणेकरुन कर्मचारी
एखादया विषयात पारंगत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलतांना श्री खवले म्हणाले, जे कर्मचारी प्रश्नांचे उत्तर
सर्वप्रथम देतील त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल असे
आवाहन त्यांनी यावेळी केले. यामध्ये प्रश्नांचे सर्वाधिक उत्तर देणारे
तहसिल कार्यालय अर्जुनी/मोरगाव येथील अव्वर कारकुन श्रीमती शांताबाई
झुर्री व तहसिल कार्यालय सडक/अर्जुनी येथील अव्वल कारकुन श्रीमती
एंचिलवार यांना जिल्हा प्रशासनातर्फे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात
येणार आहे.

उपविभागीय अधिकारी श्री सिरसाट यांनी भारतीय दंड संहिता प्रकरण 9,
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 प्रकरणे 6, 8, 10-अ, 10-ब, 10-क, 10-ड,
11, 33, 34 आणि गाव पोलीस अधिनियम याबाबत माहिती दिली.

श्रीमती लिना फलके यांनी महसूल लेखा नियम पुस्तिका (गाव व तहसिल
नमूने) याबाबत माहिती देवून सांगितले की, कार्यालयात काम करतांना टिम
वर्क म्हणून काम करावे. कोणतीही प्रकरणे आपल्याकडे आली तर ती प्रकरणे
प्रथम पंजीबध्द करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण कामे
करावीत असे त्यांनी सांगितले.

कोषागार अधिकारी श्री बाविस्कर यांनी सांगितले की, अर्जित रजा
साठवण्याची मर्यादा 300 आहे. सेवापुस्तकात स्वग्रामची नोंद करणे आवश्यक
आहे, नामनिर्देशन भरणे गरजेचे आहे. सेवापुस्तकातील नोंदी वेळोवेळी
अद्ययावत करावे. 1993 पासून गटवर्षाची सुरुवात झाली आहे. गट विमा
योजनेच्या नोंदी वेळोवळी घेण्यात यावे. सेवानिवृत्तीपूर्वी सहा
महिन्याच्या आधी सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याची कार्यवाही सुरु
करावी. सेवापुस्तकात वेळोवेळी रजेच्या नोंदी घेण्यात यावे. एखादा
अधिकारी/कर्मचारी मुख्यालयापासून 8 कि.मी.च्या वर दौऱ्यावर गेले तर
प्रवास भत्ता देण्यात येतो. महाराष्ट्र नागरी सेवा मधील सर्व नियमांची
कार्यालय प्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आयकर कपात बाबत सर्व
अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांना
चांगली वागणूक देण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महसूल
विभागातील कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने व
कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे
गरजेचे असल्यामुळे 18 सप्टेंबर रोजी महसूल विभागातील सर्व
कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करीत असतांना येणाऱ्या अडचणींचे
प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निराकरण करण्यात आले. सदर प्रशिक्षणास
कर्मचाऱ्यांतर्फे उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

सदर प्रशिक्षणास जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक राजेश मेनन,
आकाश चव्हाण, नाझर सुपचंद लिल्हारे यांचेसह महसूल विभागातील 101 कर्मचारी
उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन
चौबे यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार जिल्हाधिकारी कार्यालयाचे
प्रभारी अधिक्षक संजय धार्मिक यांनी मानले.