भाजप आमदाराच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची तोडफोड

0
9

नागपूर,दि.4- जिल्ह्यातील रामटेक येथील गढमंदिर जवळ असलेल्या बिअर बारमध्ये रामटेकचे भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या उपस्थितीत बजरंगदल आणि भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना आज घडली. राममंदिर बनविण्याच्या मागणीला घेऊन काढण्यात आलेल्या या रॅलीतील कार्यकर्ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या राजकमल रिसोर्ट जवळ पोहोचताच आक्रमक झाले आणि रिसोर्ट मध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केली. विशेष म्हणजे तोडफोड करण्यात आलेला बार राज्य सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाच्या भाडेतत्वावर दिलेल्या जागेवर आहे. आमदार तोडफोड करत असताना वर्दीधारी पोलिस  उपस्थित असूनही आंधळ्याच्या भूमिकेत होते.
आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले होते. सत्तेत असताना कायद्याचे उल्लंघन करून दादागिरी दाखवणे, तोडफोड करणे अशा प्रकारची वागणूक कितपत योग्य आहे असा प्रश्न जनतेच्या मनात आता उपस्थित होत आहे. जर सत्ताधारी आमदारच कायद्याचे पालन करीत नसतील, कायदेशीररीत्या सरकारकडे दाद न मागता स्वतः कायदा हातात घेत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.