राष्ट्रवादीची मागणी :कायदे व्यवस्था नियंत्रित करा

0
9

गोंदिया : शहर व जिल्ह्यात वाढत्या लुटमार, अपहरण व अपघातांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कायदे व्यवस्था नियंत्रीत करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीमंडळाने पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा करून गुरूवारी निवेदन दिले. 
शहर व जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दररोज लुटमार व मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोबतच अपहरण, अत्याचार व खुनांच्या घटनांनी जिल्हा गाजत आहे. या वातावरणामुळे जिल्हावासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रामुख्याने महिला असुरक्षित वाटत आहेत. या सर्व प्रकारांना बघता पोलीस विभागाचे असामाजीक तत्वांवरील वचक पूर्णपणे संपल्याचे दिसून येते. 
शहरात बाहेरगावाहून मुली व महिला कामानिमित्त व शिक्षणासाठी येतात. मात्र आजचे वातावरण बघता त्यांच्या पालकांना भीती वाटू लागली आहे. गणेशनगर परिसरात घडलेल्या मुलीच्या अपहरण व अत्याचाराच्या घटनेने अधिकच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शिवाय वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. 
या सर्व प्रकारांवर आळा बसावा यासाठी पोलीस विभागाने कंबर कसून कायदे व्यवस्था नियंत्रीत करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाने केली. आपल्या मागण्यांना घेऊन प्रतिनिधीमंडळाने पोलीस अधिक्षक शशिकुमार मिना यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले. तसेच एक प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली. 
यावर पोलीस अधिक्षक मिना यांनी संबंधित विषयांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्‍वासन प्रतिनिधी मंडळाला दिले. प्रतिनिधी मंडळात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, जिल्हा प्रवक्ता अशोक सहारे, रवी मुंदडा, शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, लता रहांगडाले, नानू मुदलीयार, हरिचंद मोटवानी व अन्य उपस्थित होते.