जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

0
19

चंद्रपूर दि.7 :: जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, नाल्यांचे खोलीकरण प्रधानमंत्री कृषी योजना, खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रस्तावित कामे व या कामांची सद्यास्थिती तसेच राज्य व केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या विकास कामांचा आढावा केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विविध खात्याच्या विभाग प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीत घेतला. ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गाडेगोणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संतान यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा प्रगती विषय आढावा खाते प्रमुखांकडून जाणून घेतला. जिल्ह्यात सिंचन सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने जलयुक्त शिवाराची कार्यकक्षा वाढवून ही योजना कार्यक्षमपणे सिंचन अभाव असलेल्या क्षेत्रामध्ये राबविण्यासाठी अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले.