गर्भवतींनो मलेरिया स्क्रिनिंग करा – डॉ.जयंती पटले

0
20

 गोंदिया,दि.9 :  बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक मलेरिया  महिना उपक्रम अंतर्गत गर्भवतींची मोफत आरोग्य तपासणी व मलेरिया कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ.जयंती पटले यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी मार्गदर्शिका म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा  हुबेकर,  जिल्हा मलेरिया कार्यालयाचे  वरिष्ठ पर्यवेक्षक  श्री. कुमरे,  बी जी डब्लु चे प्रयोगशाळा अधिकारी श्री. प्रदीप ढोके, डॉ.पौर्णिमा पतेह, राकेश शेंडे, आशिष बले, पंकज गजभिये, रवींद्र बसेन, श्री जायभाये व डेटा मॅनेजर मोहन पाटणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

       जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्प मध्ये मार्गदर्शन करतांना डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात मोफत मलेरिया क्लिनिक चालवले जाते, त्यामुळे तापाची कण कण जरी जाणवली तरी लगेच रक्ताची तपासणी करून घ्या. कोणताही ताप अंगावर काढू नका. मलेरिया प्रतिबंधक औषधी प्रत्येक सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत.

      जिल्हा मलेरिया पर्यवेक्षक श्री. कुमरे यांनी सांगितले की, 1 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान गोंदियात आरोग्य विभागातर्फे  मलेरिया बाबत व्यापक जन जागरण मोहीम हाती घेतली आहे, त्याचा जनतेने लाभ घ्यावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, परिसर स्वच्छता ठेवा, कुलरचे पाणी नियमित बदला, झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, व्हेंट पाईपला जाळी बसवा आदी सूचना श्री. कुमरे यांनी उपस्थितांना दिल्या.

      कॅम्प मध्ये महिलांना मार्गदर्शन करताना डॉ.जयंती पटले यांनी आवाहन केले की, गोंदिया जिल्हा मलेरिया साठी एनडिमिक असल्याने प्रत्येक गर्भवतीने रक्त तपासणी करून मलेरिया बाबत स्क्रिनिंग करून घेतलीच पाहिजे, कारण प्रतिबंध हाच उपाय आहे.

      या कॅम्प मध्ये 54 गर्भवतींची मोफत रक्त तपासणी व समुपदेशन करण्यात आले, मलेरिया जनजागरण निमित्त माहिती पत्रकांचे वाटप ओपीडी मधील रुग्ण व नातेवाईक यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाह्य रुग्ण विभाग व  महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना डेस्क च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.