भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0
18

नागपूर, दि. 10 : लोकांशी निगडीत मालकी हक्क नमूद करणारे अभिलेखे ठेवणारा भूमी अभिलेख हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. राजेशाही व ब्रिटीशांच्या कालखंडात तसेच स्वातंत्र्योत्तर काळापासून भूमापनाचे व अभिलेख जतन करण्याचे काम या विभागाकडून केल्या जाते. महसूल गोळा करुन राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम विभागाव्दारे होत असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना राज्यस्तरावर विशेष बैठकीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेद्वारे आयोजित 53 व्या केंद्रीय वार्षिक आमसभा व भूमापन दिनाचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, भूमी अभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) श्री. दाबेराव, संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, सरचिटणीस श्रीराम खिरेकर, कार्याध्यक्ष प्रदिप मिश्रा, मनिष कुळकर्णी, राजेश होले, प्रकाश विनकणे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी 10 एप्रिल या भूमापन दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कुठल्याही प्रकल्पाची निर्मिती होताना सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाकडून भूमापनाच्या माध्यमातून त्याचा शुभारंभ होत असतो. राज्यातील पुल, रस्ते, धरणे, कालवे, इमारती आदी महत्वपूर्ण निर्माणाधिन प्रकल्पांचे तसेच गावांचे, शेतकऱ्यांच्या शेतजमीन, वनजमीन आदींच्या क्षेत्रफळाच्या अचूक नोंदी व नकाशे तयार करण्याचे काम या विभागाद्वारे केल्या जाते. लोकांच्या मालमत्तेचे मालकी हक्क दर्शविणाऱ्या दस्ताऐवजांच्या नोंदी व जतन विभागाकडून केल्या जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोजणीचे व भूमापनाचे काम सोपे झाले असून नागपूर जिल्ह्यात मालकी हक्क दस्ताऐवज, मिळकत पत्रिकांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे, ही कौतुकाची बाब आहे, असेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या ड्रोन सर्व्हे मोहिम तसेच अत्याधुनिक रोव्हर यंत्राच्या सहाय्याने भूमापनाचे काम प्रगतीपथावर असून यामुळे अचूक मोजणीचे काम होत आहे.

भूमी अभिलेख विभागास तांत्रिक दर्जा व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. विभागातील गट ड ते गट अ पर्यंतच्या पदांच्या पदोन्नती तसेच रिक्त पदांच्या भरती संदर्भातील प्रश्न सोडविण्यात येईल. कोविडमुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती विमला म्हणाल्या, जमिनीचा मालकी हक्क नमूद करणारा हा विभाग महत्वाचा विभाग आहे. जमिनीचा खरा मालक हा भूमालक असून त्याचे दस्ताऐवज जतन करणारा विभाग हा रक्षक म्हणून काम करतो. लोकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी विभागाने जनतेची कामे जबाबदारीपूर्वक करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी. महसूल व भूमी अधिलेख विभागाने समन्वयातून लोकहितकारी कामे पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात भूमी अभिलेख विभागाद्वारे 40 हजार गावांचा ड्रोन सर्व्हे केला जात आहे. नागपूर जिल्ह्यात 8 हजार 860 गावांच्या सिटी सर्व्हेची मोहिम राबविण्यात येत असून त्याद्वारे लोकांना मिळकत पत्रिका व उतारा उपलब्ध होईल. सॅटेलाईट व रोव्हर यंत्राच्या सहाय्याने भूमापन होत असल्याने अक्षांश व रेखांश नोंदी अचूक मिळून सुरळीत दस्ताऐवज निर्माण होईल. विभागाद्वारे सर्व नकाशांचे डिजिटलायझेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती    श्री. शिंदे यांनी दिली. भूमी अभिलेख संघटनेची स्थापना व इंग्रजांच्या काळापासून विभागाद्वारे करण्यात येणारी कामे यासंदर्भात श्री. खिरेकर यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली.