सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती

0
24

दुसऱ्या दिवशी जवळपास पंधरा हजार भाविकांची हजेरी

 गडचिरोली,दि.14: गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा येथील नदी घाटावर प्रशासनाने प्राणहिता पुष्कर स्नानासाठी चांगल्या सुविधांची निर्मिती केली आहे. विविध राज्यांमधून दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. यामध्ये कर्नाटक, आन्ध्र प्रदेश, तेलंगणासह छत्तीसगड येथील भाविकांच्या गाड्या वाहन स्थळावर उभ्या असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील भाविकांसह शेजारी राज्यातील भाविकांनी सिरोंचा येथील मुख्य घाटावर गर्दी केली होती. त्यानंतर प्रशासनाने बऱ्याच भाविकांना नगरम घाटावर जाण्याच्या सूचनाही दिल्या. दुपार नंतर दोन्ही घाटांवर प्रचंड गर्दी असल्याचे दिसून आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंधरा हजार भाविक आल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. पहिल्या दिवशी रात्री सात साडेसात पर्यंत आरती होईपर्यंत आंघोळी सुरू होत्या. त्यानूसार दुसऱ्या दिवशीच्या आकड्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या दिवसापर्यंत प्रशासनाकडून आवश्यक सर्व उपाययोजना पुर्ण करण्यात आल्या आहेत. नगरम येथे पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी कमी असली तरी दुसऱ्या दिवशी मात्र भाविकांना त्याठिकाणी चांगल्या व्यवस्था असल्याचे निदर्शनास आल्याने आज गर्दी वाढल्याचे चित्र होते. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आराम करण्यासाठी सावली, आंघोळीसाठी नदी घाटाबाहेरील व्यवस्था तसेच पूजा अर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था यामूळे भाविकांमध्ये सिरोंचा तसेच नगरम घाटाची निवड केली जात आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढला : सन २०१० साली झालेल्या पुष्कर मधे महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून जेवढे भाविक पवित्र स्नानासाठी आले होते त्यापेक्षा जास्त स्थानिक भाविक आल्याचे व्यावसायिक सांगतात. पुष्कर मोठया प्रमाणात दक्षिणेकडील राज्यांमध्ये साजरा होत असला तरी पवित्र स्नान करण्यासाठी राज्यातील भाविक हजेरी लावत आहेत. गडचिरोलीसह शेजारील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर तसेच गोंदीया भंडारा येथून भाविक प्राणहितेमध्ये पुण्यस्नानासाठी आले असल्याचे दिसून येत आहे.

पोलीसांकडून पुष्करसाठी बंदोबस्त : गडचिरोली पोलीस दलाकडून जवळपास हजार पोलीस कर्मचारी वाहनतळ, रस्ते, नदी घाट व गर्दीच्या नियंत्रणासाठी तैणात करण्यात आले आहेत. भाविकांना बाधा येवू नये म्हणून वाहनांवर नियंत्रण ठेवणे, आलेल्या वाहनांना उचित स्थळी उभे राहण्यास मदत करणे, गर्दी होवू न देणे, नदी पात्रात इतरत्र असुरक्षित स्थळी आंघोळीसाठी जाणाऱ्यांवर नियंत्रण ठवणे तसेच इतर आवश्यक सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी उन्हात संपुर्ण दिवस सेवा देत आहेत. तसेच रात्रीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचे चित्र सिरोंचा शहरात पाहण्यास मिळत आहे.

एसडीआरएफची टीम सिरोंचामधे दाखल : सिरोंचा येथील नदीघाटावर काही ठिकाणी नदीची खोली जास्त आहे. काही भाविक प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता पाण्यात आतपर्यंत जाण्याची घाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे जिल्हा प्रशासनाकडून अनावधानाने दुर्घटना घडू नये म्हणून तात्काळ प्रतिसादासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा एक चमू मागविण्यात आला आहे. सदर चमू आज नागपूर येथून सिरोंचा येथे दाखल होत आहे. दोन्ही घाटावर ते भाविकांच्या सुरक्षे विषयी मदत करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थान कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

धनाजी पाटील, अति.जिल्हाधिकारी अहेरी तथा नोडल अधिकारी पुष्कर

– पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या पुढाकाराने यावेळी पुष्कर बाबत विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. अंदाजाप्रमाणे भाविक स्नान करण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. कालपेक्षा आज भाविकांची संख्या वाढत आहे ही समाधानकारक बाब आहे.

जितेंद्र शिकतोडे, तहसिलदार, सिरोंचा

आम्ही प्रशासनाच्या वतीने पुष्कर दरम्यान सिरोंचा व नगरम येथे मिळून पाच लक्ष भाविक येतील असा अंदाज समोर ठेवून तयारी करीत आहे. पुष्कर साठी जवळपास सर्वच कामे पुर्ण होत आली आहेत. आता भाविकांची गर्दीही वाढू लागली आहे. दुसऱ्याच दिवशी पहाटेपासून गर्दी वाढत सायंकाळी जास्त संख्या दिसून आली. पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, नगर पंचायत तसेच प्रशासनाचे इतर विभाग मिळून आम्ही यावेळीचा पुष्कर यशस्वीपणे पूर्ण करू.