कारखेडाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी-ऍड. यशोमती ठाकूर 

0
28
आदर्श सुनबाई व मुलींच्या जन्माचा स्वागत सत्कार सोहळा
वाशिम दि.16 – गावाच्या विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वाची असते. कारखेडा ग्रामपंचायतीने मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबविले.मुलींच्या जन्माचे तसेच आदर्श सूनबाईंचे सुद्धा स्वागत करण्याचा ग्रामपंचायत कारखेडा आणि ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.
१५ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने आदर्श सुनबाई व मुलींच्या जन्माचा स्वागत सोहळा श्री. समर्थ शंकर गिरी महाराज देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऍड. श्रीमती ठाकूर बोलत होत्या.अध्यक्षस्थानी नरेश देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा गावंडे, सरपंच सोनाली सोळंके, उपसरपंच अनिल काजळे, वंदना परांडे,जयंत देशमुख,अंजली ठाकरे, उषा देशमुख, जितेंद्र ठाकूर व सुरेश गावंडे यांची उपस्थिती होती.
            एड.श्रीमती ठाकूर म्हणाल्या, राज्यात सुद्धा मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलगी ही धनच आहे. मुलीसुद्धा वडिलांचा वारसा चालवितात. मीसुद्धा माझ्या वडिलांचा वारसा चालवीत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. देशात महिलांसाठी राज्य महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महिलांनी आता प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. वृत्तपत्र वाचन, टीव्हीवर बातम्या बघणे आवश्यक आहे.आजच्या काळात महिलांनी अपडेट असावे,असे त्या म्हणाल्या.
     कोविड काळात मानवतेचे दर्शन घडल्याचे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या,मानवतेचा सुगंध या कार्यक्रमातून दिसून आला.कारखेडा हे गाव या स्वागत सोहळ्यातून प्रगतीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समानता दिली. अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यासाठी तसेच त्यांच्या मानधन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
          श्री. देशमुख बोलताना म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना बकरी पालन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता यावा,यासाठी गोट ट्रस्ट ऑफ कारखेडाशी सामंजस्य करार करून देण्यात श्रीमती ठाकूर यांचा महत्त्वाचा असल्याचे वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती गावंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
           यावेळी लता पिंगाणे, राधिका जाधव,ओवी सोळंके, राधिका गावंडे, सारथी जाधव,सांची ढवळे, तन्वी जाधव, वैष्णवी काजळे, सारण्या राठोड, अधिरा जाधव, सोनाक्षी राठोड व आरोही इंगळे या मुलींचा देखील त्यांच्या पालकासमवेत एड.श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
           स्मार्ट सुनबाई म्हणून बेबीताई जाधव, नर्मदा राठोड, मंदा मात्रे, अर्चना पाटील, विमल परांडे, अर्चना पाटील, अंजली जोशी, अर्चना सोळके,आशा देशमुख व वनमाला शिकारी यांना देखील पैठणी, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
        प्रारंभी कारखेडा येथे आगमन होताच ऍड.श्रीमती ठाकूर यांनी श्री समर्थ शंकर गिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
        सरपंच श्रीमती सोनाली सोळंके व बबन देशमुख यांचादेखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटातील एकूण ५० महिलांना जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.अंगणवाडी सेविका ज्योती देशमुख व प्रमिला पखाले, उपक्रमशील शिक्षक गोविंद पवार व रंजीत जाधव यांचा देखील श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
         कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय जोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी,तहसीलदार श्री.किर्दक,माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,
श्री गुडधे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.भगत यांची देखील उपस्थिती होती.
          प्रास्ताविक प्रशांत देशमुख यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार मनोज देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील व परिसरातील बचत गटांच्या महिला,अंगणवाडी सेविका व परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.