बुके नव्हे, नोटबुक स्वीकारुन साजरा झाला खासदार सुनील मेंढे यांचा वाढदिवस

0
39

सामाजिक जाणीव: हजारो नोटबुक भेट, होतकरु विद्यार्थ्यांना करणार वितरण.

भंडारा--वाढदिवस म्हटला की, पुष्पगुच्छ, बुके, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू आल्याच. मात्र भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. शुभेच्छा देणाऱ्यांकडून बुके नव्हे तर नोटबुक स्वीकारले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनीच वाढदिवस असल्याने खासदार सुनील मेंढे यांनी महामानवाला अनोखे अभिवादन केले. आता गोळा झालेल्या हजारो नोटबुकचे वितरण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील होतकरू  विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.

आपल्या कामाच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विकासाचा मार्ग सुकर करणाऱ्या खासदार सुनील मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर असलेल्या ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. भंडारा शहरात बहिरंगेश्वर मंदिरात रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केले. त्रिमुर्ती चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी शितल ताकाचे वितरण केले. शहरातील वृद्धाश्रमाला भेट देऊन खासदारांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. व्यसनमुक्ती केंद्राला भेट देत तेथील व्यक्तीं सोबत खासदारांनी केक कापून आनंद साजरा केला.

संध्याकाळी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मान्यवर मंडळी, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतला गेला. पुष्पगुच्छ न देता नोटबुक भेट द्या असे आवाहन खासदार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत आलेल्या प्रत्येकाने नोटबुक भेट दिले. त्यामुळे हजारो नोटबुक गोळा झाले आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना ते नोटबुक वितरण केले जाणार आहे. त्यामुळे खासदारांना मिळालेली ही भेट अनेक गरजूंची गरज भागविणारी ठरणार आहे.