शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची जिल्हा वार्षिक आमसभा बोदलकसा येथे उत्साहात

0
104

गोंदिया,दि.17ः-शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा गोंदिया जिल्ह्याची वार्षिक आमसभा संघटना एक परिवार या भुमिकेतून निसर्गरम्य वातावरणात बोदलकसा येथे पार पडली.यात सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संघटनेचे देणगीदार सभासद स्व. हुबलाल अंबुले,नुकतेच शहीद झालेले शहीद वीर जवान महेंद्र भास्कर पारधी तसेच भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आमसभेचे औचित्य साधून ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी इयत्ता १० व १२ मध्ये प्राविण्य प्राप्त केले अशा १३ पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्या पाल्यांनी आयआयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी उच्च शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली अशा ४ पाल्यांचा सुध्दा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सैनिकी सेवेतील खडतर सेवा पूर्ण करून महाराष्ट्र नागरी सेवेत पोलीस विभागात कार्यरत असलेल्या व संघटनेचे देणगीदार सभासद म्हणून संघटनेशी जुळलेल्या १४ सभासदांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.

तसेच कोणताही वैयक्तीक स्वार्थ नसतांनाही संघटनेशी जुळून राहणारे व समाजकार्यात नेहमी पुढे राहणारे संघटनेचे सल्लागार पारखदास पटले यांचे “सफल व्यक्तिमत्त्व” या सदराखाली “सन्मान चिन्ह” देऊन अभिनंदन करण्यात आले.तथा जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा लेख लिहून संघटनेचे वार्षिक विशेषांक कर्मयोध्दे मध्ये स्थान मिळविणारा तलावांचा जिल्हा “गोंदिया -भंडारा” या लेखाबद्दल उत्तम लेख या सदराखाली जिल्हा उपाध्यक्ष टेकराम बिसेन यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच लहान पाल्यांना प्रोत्साहनपर भेट वस्तू देऊन त्यांचा सुध्दा आनंद द्विगुणित करण्यात आला.

यावेळी संघटनेच्या माजी सैनिकांच्या विविध मागण्या जसे जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ ५, १० व १५ वर्ष सेवा नुसार लागू करणे. तसेच सैनिकी सेवेत असताना अतिदुर्गम क्षेत्रात परिवारापासुन दुर राहुन देशसेवा केल्यामुळे आता महाराष्ट्र नागरी सेवेत स्व:जिल्ह्यात किंवा घरापासून ५० किलोमीटर अंतरावर बदली देणे, याबाबत मंत्रालयीन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाही बाबत सभासदांना माहिती देण्यात आली. तसेच शासन प्रशासनाचे बाबतीत खूपच उदासीन धोरण पत्करत असल्यामुळे राज्य स्तरावरील होणारी आमसभा व त्यानुसार भविष्यात संघटनेने घेतलेली आंदोलनात्मक भुमिकेला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी याबाबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर पुस्तोडे यांनी सभासदांना आव्हान केले.

आमसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रभाकर पुस्तोडे हे होते. तसेच मुख्य अतिथीं संतोष मल्लेवार, सरचिटणीस तथा माजी राज्याध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नरेश बर्वे, जिल्हाध्यक्ष नागपूर , छगनलाल गायधने, जिल्हाध्यक्ष भंडारा व सुधाकर लुटे सहसचिव भंडारा तसेच राजीराम पटले, अध्यक्ष माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, तिरोडा हे उपस्थित होते. सदर सभेच्या यशस्वीतेसाठी टेकराम बिसेन जिल्हा उपाध्यक्ष, रमेश रहांगडाले जिल्हा सहसचिव तसेच नाभिकमल चौकशी जिल्हा कोषाध्यक्ष यांनी उत्कृष्ट नियोजन केले.सुत्र संचालन  गिरधारी सोनवाने, जिल्हा सचिव तथा पवन बिसेन, तालुका अध्यक्ष तिरोडा यांनी संयुक्तरीत्या पार पाडले. आभार प्रदर्शन पवन बिसेन यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.