रोहणखेडा येथे विकास कामांचे लोकार्पण; खासदार स्थानिक निधीतून 3 सिमेंट रस्ते

0
12

वर्धा, दि. 19  : सर्वसामान्य नागरिकांच्या अद्यापही अनेक समस्या आहे. त्यांच्या या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठीच पंचायत समितीनिहाय आढावा बैठका घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

हिंगणघाट तालुक्यातील रोहणखेडा येथे राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या तीन सिमेंट रस्त्यांचे लोकार्पण गावातीलच ज्येष्ठ महिलेच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा.कुमार केतकर, आ.रणजित कांबळे, सरपंच डॅा.दिलीप बारहाते, प्रफुल्ल गुडधे पाटील, हरीश वडतकर, मनोज चांदुरकर, मंगलाताई पात्रीकर आदी उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना घरकुल, पिण्याचे पाणी, शेतापर्यंत जाण्यासाठी पांदनरस्ता, दुबार पिके घेता यावी यासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्धता या गोष्टी महत्वाच्या आहे. नागरिकांना घराचे पट्टे मिळाले पाहिजे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपण प्रयत्न करतो आहे. वर्धा शहरातील बरेच पट्टे वाटप आपण केले. इतरही ठिकाणी पट्टे वाटपाचे काम केले जात आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

पांदनरस्ते मोकळे होणे आवश्यक आहे. त्यासाठी या रस्त्यांना गावरस्त्याचा दर्जा मिळाला पाहिजे, असा रस्त्यांचा प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे. घरकुल आणि धडक सिंचन विहीरींसाठी जिल्ह्याला निधी मिळवून दिला असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेने काम करु असे सुध्दा त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.रणजित कांबळे यांनी जिल्ह्यातील नागरीकांची पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे, असे सांगितले. पट्टे वाटपासाठी शासनाने निर्धारीत केलेली प्रक्रीया पूर्ण होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास पट्टे वाटपात अडचण निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे ग्रामपंचायतींनी ही प्रक्रीया समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे यासाठी काम करावे, असे सुध्दा श्री.कांबळे म्हणाले.

यावेळी खा.कुमार केतकर, श्रीकांत बारहाते, सरपंच डॅा.दिलीप बारहाते यांचे देखील भाषण झाले. खा.केतकर यांच्या 25 लक्ष रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून रोहणखेडा गावातील तीन रस्त्यांचे सिमेंट क्रॅाक्रीटीकरण करण्यात आले असून गावातील एका वयोवृध्द महिलेच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करून या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र बारहाते यांनी केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.