12 आमदारांची शिफारस करणारे पत्र निघाले बनावट; राजभवनातून अशी पत्रे पाठवली जातात का, तपासावे लागेल, नाना पटोले

0
27

मुंबई,दि.19ः-  विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेली आहे. अशातच आज एका व्हायरल पत्राने चांगलीच खळबळ उडाली. विधानपरिषदेसाठी राज्यपालांनी 6 नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पत्र अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळाने स्वत: राजभवनानेच यावर स्पष्टीकरण देत हे पत्रच बनावट असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या बातम्यांवर लगेच पडदा पडला.

व्हायरल पत्रावरून पटोलेंची राज्यपालांवर टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेनंतर या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी राज्यपालांवरदेखील टीका केली. या बनावट पत्राची तपासणी करावी लागेल. या पत्रावर राज्यपालांची सही व राजभवनाचा शिक्काही दिसून येत आहे. त्यामुळे राजभवनातून बनावट पत्र पाठवले जातात का, हेदेखील तपासावे लागेल, असे म्हणत याप्रकरणी राजभवनावरच बोट ठेवले. किंवा राजभवनाच्या बाहेर राज्यपालांच्या नावावर काही कारस्थाने तर केली जात नाही ना, याचीही चौकशी करावी लागेल. हे पत्र आले कुठून याचा तपास होणे अत्यंत गरजेचे असल्याचे नाना पटोले म्हणाले. राज्यपालांनी या बनावट पत्राबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असेही त्यांनी सुचवले.

12 आमदारांचा काय आहे वाद?

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र अडीच वर्षांनंतरही यावर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. यादीत एक नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेदेखील आहे. यामुळे महाविकास आघाडी व राज्यपालांमध्ये जोरदार संघर्षही राज्याने बघितला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणी सुरू असून न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपाल काय व कधी निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.