“आझादी का अमृत महोत्सव उपक्रम”;23 एप्रिलला भव्य तालुका आरोग्य मेळावा

0
37

आमगाव :- आमगाव ग्रामीण रुग्णालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या निमित्ताने प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडून शनिवारी (ता.२३ एप्रिल ) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.भाग्यश्री शिंदे यांनी दिली.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार प्रफुल्ल भाई पटेल, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सहसराम कोरोटे, मार्गदर्शक डॉ.परिणय फुके, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील, विकास अधिकारी के. एस. रहांगडाले, तहसीलदार डी.एस. भोयर उपस्थित राहणार आहेत.
आमगाव येथे मंगळवारी (ता.२०) ग्रामीण रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.ग्रामीण भागातील वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मोफत व चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा व उपचार मिळावेत यासाठी अशा या शिबिराचे आयोजन होत आहे. या आरोग्य मेळाव्यात हृदय, डोळे , नाक कान, अस्थी, घसा,रक्त, लघवी, व इतर तपासण्या करून त्यावर त्या विभागाचे तज्ञाकडून उपचार करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड , आयुष्यमान भारत डिजिटल अभियान ,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना याबाबत नोंदणी करण्यात येणार असून कार्ड तयार होणार आहे.यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे स्वैच्छीक रक्तदात्यानी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या आरोग्य शिबिराचा लाभ आमगाव तालुक्यातील गरजू रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रोशन राऊत, डॉ.भाग्यश्री शिंदे यांनी केले आहे.