स्थानिक स्वराज्य संस्था मधील मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पडताळणी

0
42

गोंदिया,दि.27 : महाराष्ट्र राज्यात मागास प्रर्वगाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोगाने सूचना दिल्यानुसार जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी गोंदिया शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १९६४ ते १९९१ पर्यंतच्या निवडणुकीत मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी त्यांच्या सोबत अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा प्रशासन अधिकारी करण चव्हाण व अधिकारी उपस्थित होते.

          महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आरक्षण आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील सन १९६० पासून झालेल्या निवडणुकांची माहिती मागविली होती. त्यानुसार गोंदिया नगर परिषद मधील सन १९६४ पासून १९९१ पर्यंतच्या निवडणुकीत मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची आयोगाला सादर करण्यात आली. त्या माहितीची  पडताळणी करण्यासाठी आयोगाने जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना आदेशीत केले होते.

         त्यानुसार जिल्हाधिकारी नयना गुंडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले व मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी गोंदिया शहरात स्वतः फिरून माहितीची पडताळणी केली. यात त्यांनी अशोक शहारे, सुशीला उके, गणेश हेमने व सोमजी शेंडे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन माहितीची पडताळणी केली.

         “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोग” दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने नागरीकांकडून, संस्थांकडून, संघटनाकडून व  नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन-सूचना मागविण्यात येत आहे.

        इच्छूकांनी आपले अभिवेदन- सूचना लेखी स्वरूपात [email protected] या ई-मेल अथवा +912224062121  या व्हाट्सॲप क्रमांकावर किंवा ११५,  पहिला  माळा,  ए १ इमारत,  वडाळा  टर्मिनल, वडाळा आर.टी.ओ. जवळ, वडाळा, मुंबई – 400037 या पत्त्यावर १० मे २०२२ पर्यंत पाठविण्याचे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.