सालेकसा नगरपंचायत इमारतीला आग

0
28

सालेकसा- स्थानिक नगरपंचायत इमारतीला मंगळवार, २६ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग लागली. दरम्यान, न. पं.च्या अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत कार्यालयातील महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. सालेकसा नगरपंचायत स्थापनेचा मुद्दा मागील चार वर्षांपासून चर्चेत होता. त्यामुळे, ग्रामविकासातही अडथळे निर्माण झाले. अखेरीस मुरूमटोला, हलबीटोला, जांभळी बाकलसर्रा, सालेकसा, आमगाव खुर्द, तिकडेनगर आदी गावे मिळून सालेकसा नगरपंचायत अस्तित्वात आली.
मंगळवार, २६ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता न. पं. इमारतीला आग लागली. आग लागताच न. पं.च्या अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतल्याने काही वेळातच आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत तत्कालीन सालेकसा ग्रामपंचायतींतर्गत असलेली अनेक कागदपत्र जळाले. यात घरकूल फाईल, प्रस्ताव, जन्ममृत्यू नोंद, विवाह नोंदणी व इतर महत्त्वाची कागदपत्र जळाले आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांना तसेच न. पं. प्रशासनाला ते दस्ताऐवज मिळविण्याकरिता मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ही आग कोणी लावली हे अद्याप समोर आले नसून याप्रकरणी सालेकसा पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास आग लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आग कार्यालयात पसरत नसल्याने अज्ञात व्यक्तींनी पुन्हा पहाटे ४.३0 वाजताच्या सुमारास आग लावतानाचे फुटेज इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असल्याची माहिती लेखापाल संदीप लहाने यांनी दिली.