गडचिरोलीत मोहफुलांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार सहाय्य करणार – अजित पवार

0
21

गडचिरोली,दि.२९ एप्रिल-मोहफुलांसह इतर फुलांच्या दारूचा विदेशी मद्यप्रकारात समावेश केला आहे. गडचिरोलीत मोहफुलांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करण्यासाठी स्थानिक जर पूढे येत असतील तर राज्य सरकार विशेष सहायता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी अनुकूल आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

गडचिरोलीत पोलीसांच्या नक्षलविरोधी विशेष पथक सी-६० च्या वाढीव तुकड्यांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्या संदर्भात पोलीस मुख्यालयात आयोजित विविध कार्यक्रमाकरीता ते आले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी त्यांचे समवेत उपस्थित होते. सदर दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलप्रभावित कटेझरी पोलीस मदत केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस दरबारात त्यांनी मार्गदर्शन केले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की गडचिरोलीत पोलीस जवानांचे काम चांगले आहे. नक्षलवाद्यांसोबत लढतांना शासनाच्या विविध योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करीत आहेत. या भागातील पोलीसांच्या आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेतल्या असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतले जातील.

नक्षल पिडीत आणि पोलीस खबरी म्हणून मारल्या गेलेल्यांच्या कुटूंबातील एकाला नोकरी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वाढवून दिला असुन वीस हजार कोटींचा स्टील कारखाना टप्प्याटप्प्याने ऊभा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वेच्या कामाला गती आलेली असून विमानतळ उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव घेऊन मुंबईला चर्चेकरीता बोलविले असल्याचे त्यांनी सांगितले.

भोंग्यांपेक्षा राज्यातील जनतेचे प्रश्न महत्त्वाचे

भोंग्यांच्या मुद्यावरुन आघाडी सरकार बॅकफूटवर आले काय या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की हा विकासाचा मुद्दा नाही भोंग्यांपेक्षा राज्यातील जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजप मनसे युतीवर प्रतिक्रिया विचारली असता यावर सत्तेसाठी अशा आघाड्या होत असतात त्यांची झाली की नाही हे मला माहित नाही.परंतू अशा आघाड्या फार काळ टिकत नाहीत. असे अजितदादांनी स्पष्ट केले.