महाराष्ट्र दिनी राज्यभरात सामाजिक न्यायाचा जागर होणार

0
17
*प्रत्येक गावात पोहोचणार योजनांची माहिती* .
*अधिकारी /कर्मचारी यांचा व्यापक सहभाग*
 वाशिम दि.३०-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर होणार आहे. राज्यातील प्रत्येक गावात योजनांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट या निमित्ताने समाजकल्याण विभागाने ठरविले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
     सदर योजनांच्या माहिती व प्रसारासाठी विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित असून प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात विभागाच्या योजनांची माहिती पुस्तके पोहोच करण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गेल्या तीन चार दिवसात अनेक बैठका राज्यस्तरावर आयोजित करून याबाबत सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील याबाबत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करणे बाबत कळविण्यात आले आहे.
        दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे. यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून समाज कल्याण विभागाने जागर कार्यक्रम आयोजित केला आहे.
       अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान दि. १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका गावागावात पोहोच करण्यात आले आहेत.
          समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन याबाबत सहभाग घेणार आहेत तसेच तालुका समन्वयक, समता दूत तसेच स्वयंसहायता युवा गटाचे प्रतिनिधी गावागावात पोचून योजनांची माहिती जनतेला करून देणार आहे.
राज्यात अशा पद्धतीने प्रथमच अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाच्या वतीने होत असल्याने गावा-गावात व घरा-घरापर्यंत योजनांचा प्रचार प्रसार होण्यासाठी मदत होणार आहे.