32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ पोलीस भरतीत होमगार्ड जवानांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत द्या

पोलीस भरतीत होमगार्ड जवानांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत द्या

0
21

आ. विजय रहांगडाले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तिरोडा-महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानांच्या हिताचा विचार करून आगामी पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये त्यांना वयोमर्यादेत किमान ५ वर्षांची सवलत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय भरत रहांगडाले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या संवेदनशील विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने विविध कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामांमध्ये, आपत्ती व्यवस्थापनात तसेच विविध शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अत्यंत कमी मानधनावर कार्यरत राहूनही या जवानांनी समाजसेवेचे व राष्ट्रसेवेचे कार्य सातत्याने केले आहे. सदर होमगार्ड जवानांना पोलीस विभागातील कामकाजाचा प्रत्यक्ष व चांगला अनुभव असल्याने त्यांचा पोलीस दलात समावेश होणे राज्याच्या सुरक्षिततेच्या व प्रशासकीय दृष्टीनेही अत्यंत हितावह ठरणार आहे.
परंतु, अनेक होमगार्ड जवानांनी दीर्घकाळ सेवा बजावल्यामुळे आणि सध्या असलेल्या विद्यमान वयोमर्यादेच्या अटीमुळे त्यांना पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. वाढत्या वयामुळे अनेक पात्र आणि अनुभवी जवान या संधीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून होमगार्ड जवानांना वयोमर्यादेत किमान ५ वर्षांची शिथिलता देऊन आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. रहांगडाले यांनी केली आहे. आता यावर गृह मंत्रालय काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.