देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान – पालकमंत्री प्राजक्त तनपुरे

0
48

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन साजरा

गोंदिया,दि.1 : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने गेल्या 62 वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान आहे असे गौरोदगार पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले.

 पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमीत्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना श्री. तनपुरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. तनपुरे पुढे म्हणाले, नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. विकासाच्या पंचसूत्रीवर आधारित हा अर्थसंकल्प आहे. कृषी व संलग्न सेवा, सार्वजनिक आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग ही ती पंचसूत्री आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.

         खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत 1 लाख 20 हजार शेतकऱ्यांकडून 35 लाख 56 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. याची किंमत 690 कोटी एवढी आहे. 684 कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आज अखेर एकूण 27 हजार 874 शेतकरी पात्र झालेले आहे. त्यापैकी 27 हजार 406 शेतकऱ्यांना 110 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

        गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 52 वारसांना 1 कोटी 2 लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंर्गत आतापर्यंत 13 हजार 913 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

         महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत एकूण रुपये 15 हजार 934.97 लक्ष निधी खर्च झालेले असून त्यामधून 64.33 लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 2 लाख 3 हजार 428 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.

        कोविड-19 संसर्गामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन्ही पालक गमावलेले एकूण 11 बालके असून, सदर बालकांच्या नावे महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत एक रकमी 5 लाख रुपये मुदत ठेव जमा करण्यात आलेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून 11 बालकांच्या 6 कुटूंबांना 50 हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य लाभ देण्यात आलेला आहे.

        शासन अनुसूचित जातीच्या लाभार्थींना विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देत आहे, ज्यामध्ये  शिष्यवृत्ती योजनेत 5327 विद्यार्थ्यांना लाभ मंजूर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत 202, वसतिगृहमध्ये 454 विद्यार्थ्यांना, निवासी शाळामध्ये 268 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. रमाई घरकुल योजनेमध्ये 2078, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये 1353, धनगर घरकुल 15 असे एकूण 3446 घरकुलाला समितीने मंजुरी प्रदान केली आहे.

        मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसह विद्युत वितरण कंपनीद्वारे अन्य योजनेत जिल्ह्यात लक्षणीय काम झाले आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. मत्स्यबीज निर्मितीत जिल्ह्यात मोठे काम झाले आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, महाआवास योजना ग्रामीण मध्ये गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम आला ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनेत जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम काम केले असून यापुढेही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन-प्रशासन कटिबध्द आहे असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

        प्रारंभी पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, पुरुष व महिला होमगार्ड पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले.

        कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड,निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.