पाणी पुरवठा योजनेमुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली – मंत्री सुनील केदार

0
11

नागपूर, दि. 01 :  पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे अनेक काळापासून ग्रामस्थांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली आहे. यासोबतच गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

गोधनी ( रेल्वे ) येथे पाणी पुरवठा योजनेचा लोकापर्ण  सोहळा श्री. केदार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, अपर्णा राऊत, माजी जि.प. सदस्य ज्योती राऊत, सरपंच दिपक राऊत, जिवन प्राधिकरणाचे श्री. बिडवायकर, आदी यावेळी उपस्थित होते.

आधी गोधनी ग्रामस्थांना गोरेवाडा येथून पाणी पुरवठा होत होता, दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी पुरवठा अपूरा पडत होता. या योजनेमुळे नागरिकांना भरपूर पाणी उपलब्ध होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांनी जनकल्याणाचा वारसा पुढे नेला पाहिजे व कृतीत उतरविला पाहिजे तरच क्षेत्राचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. गोधनी (रेल्वे) परीअर्बन ग्रामपंचायत असल्याने तेथील पाण्याच्या सुविधेबरोबरच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने विकासात्मक कामावर जास्त भर दया, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषदद्वारे राबविला जाणारा गरजुंना गाई व शेळ्या वाटपाच्या पायलट प्रकल्पामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उंचावण्यास मदत होणार आहे. सहकार्यातून काम केल्यास ग्रामपंचायत प्रगतीपथावर राहील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत यांनी मार्गदर्शनपर भाषण झाले. जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. गोधनी स्मशानभूमीची प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दिपक राऊत यांनी केले. 2 कोटी 18 लक्ष रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे गावाचा पिण्याच्या पाण्याची समस्या नाहीशी झाली आहे. त्याचबरोबर पेंच येथून नागपूरला जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनमधून बोकारा व गोधनी येथे मनपादराने या गावांस पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतीचे औचित्याने येथील ग्रामपंचायतीद्वारे श्री. केदार यांचा मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी त्यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करुन पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.