39 हजार 503 गरोदर मातांना मिळाला,प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ

0
31

भंडारा, दि. 27 : गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतांनाही मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व माता कुपोषित असून त्यांच्या व त्यांचे नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या बालकांचेही आरोग्य सुधारावे तसेच मातामृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ ही योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात 39 हजार 503 गरोदर मातांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 17 कोटी 95 लक्ष 6 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाचे अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशा पात्र महिलांना गरोदर काळात माता, शिशू सुदृढ व निरोगी राहावे व गरोदर मातांना सकस आहार घेता यावा. याकरिता केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापूर्तीच मर्यादित आहे व सदर लाभ एकदाच घेता येईल. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्माला आल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच अनुज्ञेय राहील. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात (डीबीटी) मार्फत केंद्र शासनाकडून जमा करण्यात येते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस रुपये पाच हजार एवढी रक्कम आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीव्दारे तीन टप्यात जमा केली जाते. भंडारा जिल्ह्यात जानेवारी 2017 पासून ग्रामीण व शहरी भागातील 39 हजार 503 लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर 17 कोटी 95 लक्ष 6 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रथम खेपेच्या गरोदर मातांना आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, या योजनेचा लाभ घेण्याकरिता निकटच्या आशाताई, एएनएम व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेकरिता गरोदर मातेचे आधार कार्ड, पतिचे आधार कार्ड, बँक संलग्न आधार लिंक पासबुक किंवा पोस्टाचे खात्याची झेरॉक्स प्रत, गरोदरपणाची 150 दिवसाच्या आत नोंदणीबाबत माता बालसंगोपन कार्डची झेरॉक्स, जर प्रसुती झाली असल्यास बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण कार्ड या दस्ताऐवजाची आवश्यकता असेल.

गरोदरपणाच्या काळात सकस आहार व ईतर बाबींवर भरपूर खर्च होतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल माझ्या वार्डातील आशा कार्यकर्ती सुनिता डाकरे यांनी मला माहिती दिली. आरोग्य संस्थेत नोंदणी होताच व कागदपत्रे आशाताई कडे दिल्यावर पहिला लाभ एक हजार रुपये प्राप्त झाला. दुसऱ्या लाभाकरिता आशाताई घरी येऊन आधारकार्ड झेरॉक्स व फॉर्म भरुन घेतला व 16 एप्रिल 2019 ला दुसरा लाभ दोन हजार रुपये प्राप्त झाले. माझी प्रसूती झाल्यानंतर मुलीला लसीकरणाचा पेंन्टा-3 चा डोस दिल्यानंतर तिसरा दोन हजार रुपयाचा लाभ मिळाला, असे एकूण पाच हजार रुपये बँक खात्यात प्राप्त झाले. त्यामुळे मला आर्थिक मदत झाली

 -कुंदा रोहन पटले, लाभार्थी