उपविभागीय कार्यालयात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी घेतला विविध विभागाचा आढावा

0
39

अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोर उपविभागीय कार्यालय येथे २७ मे २२ रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपविभागीय अधिकारी तसेच दोन्ही तालुक्यातील अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात वन विभागाचे प्रलंबित प्रकरणात चर्चा करण्यात आली. दोन्ही तालुक्यात राजस्व गाव व वन विभागाचे किती गावी येत आहेत ज्यामुळे रस्त्यांचे काम होत नाही, दोन्ही नगरपंचायतमध्ये महसूलची जागा किती आहे, त्याचे टी.एल.आर. मार्फत सर्वेक्षण करून संयुक्त बैठक घेऊन रिकॉर्ड तयार करण्याची सूचना दिल्या. तसेच नगरपंचायतील नागरिकांना जागेच्या कायम स्वरूपाची स्थायी पट्टे देण्याची प्रक्रिया गतिशील करणे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली.

याशिवाय संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचा उत्पन्नाचा दाखला तात्काळ मिळावा व विविध अडचणी दूर व्हाव्यात, अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक कष्टगरी, गोर-गरीब व निराधार असून ते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे. तसेच सदर लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रत्येक गावातील तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे शिबीराचे आयोजन करून त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता सदर शिबीरामध्ये करून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे. तसेच लाभार्थ्यांचे प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दोन्ही तहसीलदार यांना दिल्या.

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, ग्रामपंचायतीने प्रत्येकी २ कोटीच्या नियोजन करावा, ड यादीतील लोकांचे घरकुल अपूर्ण राहिले आहेत ते त्वरित पूर्ण करावे, गरजू लाभार्थ्यांना लाभ द्यावे, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा अंमलबजावणी करावा,  असे सूचना आमदार चंद्रिकापुरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.

त्याचप्रमाणे नवीन रेशन कार्ड आणि रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य मिळत नाही याबाबतही पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी समूह पीक पद्धतीने (cluster approach) शेती करुन उत्पादन खर्च कमी करावे तसेच उत्पादित शेतीमालाची प्रतवारी व मूल्यवर्धन करुन योग्य विक्री व्यवस्थापणेच्या माध्यमातुन अधिकचा नफा शेतकऱ्यांनी प्राप्त करावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कृषि प्रकिया युनिटद्वारे शेतकऱ्यांना रोजगाराची उपलब्धता,  तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत सूचित केले.

सदर बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अर्जुनी मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम, सडक-अर्जुनी तहसीलदार किशोर बागडे,  मुख्याधिकारी नगरपंचायत अर्जुनी/मोर शिल्पा राणी जाधव,  गट विकास अधिकारी विलास निमजे, श्रीकांत वाघाये, आरएफओ दुर्गे, पुरवठा अधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, शहारे उपअभियंता विद्युत विभाग संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.