सडक अर्जुनी,दि.07ः मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेल्लन आणि पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील दादर माटुंगा सभागृहात दि.6 जून रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील 25 क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या 111 मानकऱ्यांना मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमाली जोशी या समारंभच्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तालुक्यातील कोहमारा येथील प्रसिद्ध कवी, पत्रकार अश्लेष माडे यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. याआधी सुद्धा कवी अश्लेष माडे यांना साहित्यातील कविरत्न, साहित्य रत्न, साहित्यभूषण,असे अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यामुळे त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.