जिल्ह्यातील धानखरेदी केंद्रात सावळागोंधळ,धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करा

0
54

 माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली पाहणी

गोंदिया : धान खरेदी केंद्रावरील सावळागोंधळ व शेतकर्‍यांना होत असलेल्या समस्या लक्षात घेत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सौंदड येथील सहकारी भात गिरणी केंद्राला आज, ७ जून रोजी भेट देवून पाहणी केली. यावेळी सदर केंद्र ४ जूनला सुरू झाल्याचे समजून आले. दरम्यान कोणत्याही शेतकर्‍यांना पावती न दिल्याचे निदर्शनास आले. केंद्रावर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ४०.६ किलो मोजणीची तरतूद असताना ४१.५ किलो धान मोजणी केले जात असल्याचे दिसून आले. या संदर्भात कर्मचार्‍याला विचारले असता संस्थेच्या अध्यक्षाचे आदेश असल्याचे कर्मचार्‍याने मान्य केले. तसेच शेतकर्‍यांची असभ्यपणे वागणे, वेळेवर ऑनलाईन न केल्याने धान उघड्यावर पडून राहिल्याचे दिसून आले. हमालीचा दर शासकीय दराप्रमाणे १० रूपये असताना याशिवाय प्रति पोते अतिरिक्त १५ रूपये घेत असल्याचा प्रकार समोर आला. तसेच शेतकर्‍यांना डावलून व्यापार्‍यांचे धान प्राधान्याने घेत असल्याची तक्रार माजी मंत्री बडोले यांच्याकडे करण्यात आली. यावर बडोले यांनी जिल्ह्यातील केंद्रांवर सुरू असलेला सावळागोंधळ थांबवून शेतकर्‍यांची लुबाडणूक होणार नाही. यासाठी मार्केटिंग अधिकार्‍याने लक्ष द्यावे, अन्यथा शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा दिला.
यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष व माजी जि.प.सभापती अशोक लंजे, पं.स.सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जि.प.सदस्य भुमेश्वर पटले, कविता रंगारी, निशा तोडासे, पं.स.सदस्य चेतन वडगाये,गिरधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, लक्ष्मीकांत धानगाये, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, शिशिर येडे, हर्ष मोदी, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, सुशिल लाडे, संदिप रामटेके, पृथ्वीराज भेंडारकर आदिसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करा
– माजी मंत्री बडोले यांची जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांशी चर्चा
गोंदिया : धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह केंद्रावरील इतर समस्यांना घेवून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील कार्यालयात जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयी यांच्याशी आज (ता.७) चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी १ ते ५ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्वच केंद्र सुरू होतात. मात्र यावर्षी महिना उलटूनही अद्यापही धानखरेदी केंद्र सुरू झालेले नाही. सडक अर्जुनी तालुक्यात फक्त ३ केंद्र सुरू झालेली आहेत. यात सौंदड, पांढरी व धानोरी या गावातील केंंद्राचा समावेश आहे. त्यातही या केंद्रावर अत्यल्प धानखरेदी झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. उन्हाळी धान खरेदी करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असताना केंद्र सरकारवर जबाबदारी टाकून शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. तो संभ्रम थांबविण्यात यावा तसेच केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टापैकी जिल्ह्यात फक्त १० टक्के धानखरेदी आजपर्यत झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.