विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणार-सचिन राजुरकर

0
15

नागपूर,दि.14: महाज्योती संस्थेद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ऑनलाईन प्रशिक्षण त्वरीत बंद करून विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात यावे,अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांना निवेदनातून दिला आहे.

महाज्योती द्वारे वर्ग ११ वी व १२वी च्या विद्यार्थ्यांना NEET व IIT मध्ये ओबीसी, वि.जा., भ.ज. व विशेष मागास वर्ग विद्यार्थांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मागील ६ महिन्यापासून स्टडी मटेरिअल, टॅब व इंटरनेट डाटा अजुन पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला नाही आहे. प्रशिक्षणाचे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच ब-याच खाजगी कोचिंग क्लास ऑफलाईन सुरु असतांना महाज्योती ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. तसेच पोलिस प्रशिक्षण सुद्धा ऑनलाईनच सुरु आहे. हे प्रशिक्षण ऑफलाईन सुरु करण्यात यावे. राज्यात वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदभरत्या निघणार आहेत, त्यांना सुद्धा बार्टीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुरु करुन प्रशिक्षण देण्याचे करावे. या मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी शिष्टमंडळासह महाज्योतीचे व्यस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी डांगे यांनी लवकरच विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रशिक्षणासह टॅब व इतर साहित्य देण्याचे मान्य केले. १५ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास महाज्योतीच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात युवा अध्यक्ष पराग वानखेडे, कार्याध्यक्ष शुभम वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष विनोद हजारे, उपाध्यक्ष सुशांत शिरपुकर, राहुल निमजे, सौरभ सिंग इत्यादी उपस्थित होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, महाज्योती चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे, संचालक दिवाकर गमे, संचालक लक्ष्मण वडले त्यांनासुद्धा निवेदने देण्यात आली आहे.