
जिल्ह्यातील शंभरटक्के ग्रामपंचायतींनी या योजनेत हिरीरीने सहभाग घ्यावा
गोंदिया, दि 15: राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेच्या निकषात व स्वरुपात बदल करुन राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल अशा पध्दतीने पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरुवात करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील शंभरटक्के ग्रामपंचायतींनी या योजनेत हिरीरीने भाग घेऊन योजनेची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासोबतच मागील निवड झालेल्या तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
या योजनेची स्पर्धात्मक सुरुवात 2016-17 या आर्थिक वर्षापासून करण्यात येऊन राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार, शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञान यांचा वापर अशा बाबींवर गुणांकनाच्या आधारे सुंदर गाव ग्रामपंचायतीची निवड करुन जिल्हास्तर व तालुकास्तर असे पुरस्कार देण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या 20 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना असे नाव देण्यात आले असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. 1 जुन पासून सुरवात करण्यात येऊन आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्य 16 फेब्रुवारी 2023 रोजी तालुका व जिल्हा सुंदर गाव ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.