भंडारा- भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आग्रही मागणीनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून वैनगंगा नदीच्या प्रदूषणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे वैनगंगा प्रदूषणमुक्त होणार असल्याची पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाली आहे.
भंडारा व पवनी तालुक्यातील नदी काठावरील ३८ गावांना अभिशाप ठरलेली जीवनदायीनी वैनगंगा प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त व्हावी यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या या भूमिकेची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दालनात १७ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. वैनगंगा नदीपात्रातील प्रदूषणावर आळा घालण्यासाठी तात्काळ एक समिती तयार करुन महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांना दिले.
वैनगंगा नदीपात्रात नागपूर शहरातील व नागपूर एमआयडीसी कारखान्यातील ५६0 एमएलडी प्रदूषित पाणी नागनदी व कन्हान नदीतून वैनगंगा नदीपात्रात सोडले जाते. यातील ४३0 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र उर्वरीत १३0 एमएलडी दूषित पाणी वैनगंगेत सोडले जाते. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात इकॉर्निया वनस्पती प्रचंड प्रमाणात वाढली असून यामुळे नदीपात्रातील जलजीवसृष्टी व नदीकाठावरील गावांमधील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैनगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलण्याला सुरुवात केली आहे.
नागपूर मनपा आयुक्तांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत जलशुध्दीकरण प्रकल्प तयार करुन तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिन शिनगारे, एमआयडीसी सीईओ, अप्पर सचिव, नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन, नागपूर सुधार प्रन्यास सभापती सुर्यवंशी आदी उपस्थित होते.