युग चांडक अपहरण-खून खटल्याचा निकाल आज

0
14

नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय शनिवारी जाहीर करणार आहे.राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना, अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे या आरोपींनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटी समोरून अपहरण केले होते.

अपहरणकर्त्यांनी आधी १० कोटी आणि नंतर ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. अपहरणकर्त्यांनी युगचा दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निर्घृणपणे खून केला होता. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी खुद्द दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुली देऊन नाल्यातील रेतीमध्ये पुरलेला युगचा मृतदेह दखवला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. सरकार पक्षाने एकूण ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासलेले आहेत. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजेश्री वासनिक, आरोपी अरविंद सिंग याच्यावतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले.