अर्जुनी/मोर येथे सत्कार समारंभ थाटात
अर्जुनी /मोर दि.21:- पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामीण क्षेत्रात लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय.त्यामुळे राजकारण बाजूला सारून प्रामाणिक पणे जनतेची सेवा करण्याची गरज आहे. असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी (ता.21) येथे केले.
सरपंच उपसरपंच संघटना, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजराम लोगडे हे होते. मंचावर उपस्थित सभापती संजयसिंग टेम्भरे, जि. प. गटनेते लायकराम भेंडारकर, माजी उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, पंचायत समितीच्या सभापती संगीता कोडापे, उपसभापती होमराज पुसतोडे, गटविकास अधिकारी विलास निमजे,सिरेगांवबांधचे माजी सरपंच संग्रामे तसेच तालुक्यातील सातही जिह्वा परिषद गटाचे आणि चवदा पंचायत समिती गणांचे सदस्य सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना उपाध्यक्ष श्री गणवीर म्हणाले की,जनतेच्या आरोग्य, शिक्षण, विद्युत या सारख्या अडचणीवर मात करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. लोकांची क्रयशक्ती कशी वाढली पाहिजे असे सांगून मी आणि माझे राष्ट्र
यासाठी दररोज मंगलमैत्रीचे पठण करतो असे ते म्हणाले.
यावेळी सभापती श्री टेम्भरे म्हणाले की, कोरोना काळात थांबलेली ‘ गतीची ‘आता कशी ‘प्रगती’शील होईल यावर विचार करण्याची गरज आहे. तालुक्यातील सर्वच जि. प. सदस्य वजनदार असून सरपंच आणि ग्रामसेवकांनी समन्वय साधून कार्य केल्यास या तालुक्याचा विकास झपाट्याने होईल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान माजी उपाध्यक्ष श्रीमती गहाणे म्हणाल्या की, विकासाची कामे करताना नियमांच्या चकोरीत राहून आणि विविध अडचणींना मात देऊन हे कार्य पूर्ण करावं लागतं,यासाठी जणप्रतिनिधीना संघर्ष करावं लागतं असे त्या म्हणाल्या. यावेळी गटनेते श्री भेंडारकर,सभापती श्रीमती कोडापे,माजी सरपंच संग्रामे, प. स. सदस्य श्री घाटबांधे यांनीही प्रयोजित विचार मांडले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उपाध्यक्ष श्री गणवीर, जि. प. सभापती श्री टेम्भरे यांच्यासह मंचावर उपस्थित तालुक्यातील सर्वच नवनियुक्त जि. प. सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी श्री निमजे, सहाय्यक गट विकास अधिकारी अरुण गिरीपुंजे आणि पंचायत विस्तार अधिकारी जि. टी. सिंगणजूडे यांच्यासह सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी समरीत, पदोन्नत कृषी विस्तार अधिकारी पि.आर. कुटे, तसेच स्थानांतरित झालेल्या ग्रामसेवक कु. आंबेडारे यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सरस्वती संगित विद्यालयाचे शिक्षक श्री परशुरामकर आणि संच यांच्या शास्त्रीय संगीतमय कार्यक्रमामुळे चांगली रंगत आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुकळी आणि ताडगावच्या दिवंगत सरपंचाना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अजय अंबादे यांनी, संचालन ग्रामसेवक धर्मेंद्र पारधी यांनी तर आभार सरपंच ब्राम्हणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.