‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत 10 लक्ष राष्ट्रध्वज फडकणार

0
6
जिल्हयातील सर्व यंत्रणांच्या सहभागाचे आवाहन
नागपूर-जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अधिनस्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा ‘ अभियानांतर्गत नागपूर महानगर व नागपूर ग्रामीण मिळून एकूण दहा लक्ष राष्ट्रध्वज उभारले जावेत यासाठी नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारणे या मोहिमेत अपेक्षित असून त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला, सुधारणांना आपल्या देशाच्या सामर्थ्याला, जनतेपुढे मांडणे, यासाठी प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी ‘ हर घर झेंडा ‘ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. राज्यात हाच उपक्रम आता ‘हर घर तिरंगा ‘ या नावाने राबविण्यात येणार आहे. या अभियानात योग्य आकाराचे कापडाचे तिरंगा ध्वज, सर्वसामान्यांना मिळेल अशी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मात्र प्रत्येक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपल्या घरावर आपला अभिमान असणारा तिरंगा डौलाने फडकेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सामान्य नागरिकांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती भवनात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हास्तरीय कोअर कमिटीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त निर्भय जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, प्रकल्प संचालक इलमे,यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
या अभियानाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा ‘ हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थानी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने प्रसिद्धी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन आपल्या घरावर उभारावा, यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे स्पष्ट करण्यात यावे. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी प्रत्येक सामान्य माणसाला योग्य मार्गदर्शन केले जावेत, हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी, कापडापासून बनविलेला झेंडा असेल याची खातरजमा करावी. राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात सामान्य नागरिकांना उपलब्ध होईल यासाठीची खात्री बाळगण्याचेही त्यांनी आवाहन केले. राष्ट्रध्वजाबद्दल ध्वज संहिता असून त्याचे पालन झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याबाबतची काळजी घेण्याचेही निर्देश त्यांना देण्यात आले. आपल्या घरावर तिरंगा लावल्याची छायाचित्रे, चित्रफीत, ध्वनिमुद्रण केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या अमृत महोत्सव डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे त्यांनी सांगितले.