राष्ट्राच्या विकासात युवकांची भूमिका महत्वाची – पालकमंत्री राजकुमार बडोले

0
107

 

 

गोंदिया,दि.५ : आजचा विद्यार्थी उदयाचा युवक आहे. आपणही या समाजाचं व राष्ट्राचं काही देणं लागतो याचे युवकांनी भान ठेवावे. शिक्षण म्हणजे समाज व संस्कृतीला जोडणारा दुवा आहे. म्हणूनच राष्ट्राच्या विकासात युवकांची मोठी भूमिका आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. आमगाव येथील भवभूती महाविद्यालयात आयोजित श्रध्देय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे उद्घाटक ते बोलत होते. यावेळी मेजर ध्यानचंद क्रीडा सभागृहाचे लोकार्पणही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिलनाडू वेल्लूरचे डॉ. अप्पाजी स्वामी उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, भाजपा महा.प्रदेशचे सरचिटणीस रामदास आंबटकर, डॉ. खुशाल बोपचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बडोले म्हणाले, अनेक विद्यार्थी कठीण परिस्थीतीत संघर्ष करुन शिक्षण घेतात. परंतु आपली बौध्दीक सेवा मात्र परदेशात देतात. युवकांनी आपल्या देशातील प्रशासन, तंत्रज्ञान व विविध क्षेत्रात सेवा देवून राष्ट्राचा विकास साधावा.
अम्ब्रीशराव आत्राम यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा असे सांगितले. आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यास व परिश्रमाला पर्याय नाही. असेही ते म्हणाले. संजय पुराम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना समृध्‍द जीवन जगण्यासाठी अभ्यास करावा असे सांगितले.
याप्रसंगी लक्ष्मणराव मानकर गुरुजींचे सहयोगी नत्थूलाल ठाकूर, बाबूलाल अग्रवाल, प्रेमलाल बोपचे, प्रेमलाल चौधरी, मोतीलाल कुकरेजा, बाबूलाल उपराडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, पशूसंवर्धन सभापती छाया दसरे प्रामुख्याने उपस्थित होते. भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, श्रीराम भूसकुटे, प्राचार्य जी.आर.मच्छीरके व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. आदर्श विद्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केले. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. भवभूती महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे विमोचन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.