पुराला वैनगंगेवरील लहान पूल कारणीभूत

0
22

भंडारा-दरवर्षी पावसाळ्यात भंडारा शहराला पुराचा फटका बसतो. सलग तीन वर्ष आलेला पूर चिंता निर्माण करणारा आहे. दरम्यान, वैनगंगेवरील ब्रिटीशकालीन लहान पुलामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडचण निर्माण होत असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा पूल पाडण्याचा प्रस्ताव गोसेखुर्द धरण विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे येत्या दिवसात हा पूल इतिहासजमा होणार आहे.
भंडारा शहराला २0२0 मध्ये आलेल्या महापूराचा मोठा फटका बसला. त्यानंतर यावर्षी ऑगस्टमध्ये सलग तीनदा पूराची स्थिती निर्माण झाली. या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले तसेच त्यांना घर सोडून विस्थापित व्हावे लागले. वैनगंगा नदीवर १९२९ मध्ये बांधलेल्या पुलामुळे पाण्याचा प्रवाहाला अडसर निर्माण होत असून त्यामुळे पुराचे स्वरूप गंभीर झाल्याचे गोसेखुर्द धरण विभागाचे म्हणणे आहे. पुलाचे रुंद खांब पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरत असल्याने कारधा येथील वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत आठ मीटरने वाढ झाली. हेच पाणी शहरात शिरले. त्यामुळे कारधा येथील हा जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या निर्णयाबाबत गोसेखुर्द धरण विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले आहे. जिल्हा प्रशासनाने गोसेखुर्द धरण विभागाला राष्ट्रीय महामार्गाच्या भंडारा बायपासचे रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूल पाडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणारा हा पूल लवकरच काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे. हा पूल पाडल्यास नव्या पुलावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे बायपास रस्ता तयार झाल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रूंद खांबांमुळे अडसर
कारधा येथील जुन्या पुलाची रचना ब्रिटीशकालीन असून जुन्या पद्धतीची आहे. आकाराने मोठय़ा व्यासाचे खांब पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढून पाणी शहरात शिरण्यास कारणीभूत ठरत आहे. याशिवाय बायपास रस्ता, आंभोरा येथील केबल पूल बांधल्याने वैनगंगा नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला. यासाठी जुना पूल पाडण्याबाबत गोसेखुर्द धरण विभागाने जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली