सिमेंट रस्त्यांची उंची वाढवू नका; नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांना मागणी

0
32

अर्जुनी-मोरगाव : शहरात सिमेंट रस्ते आणि गटार लाईनचे बांधकाम सुरू आहे. निर्माणधीन बांधकामाच्या निवेदीतील संभ्रमामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. शहरातील शिवनारायण पालीवाल ते अर्बन बँक चौक दरम्यान होणाऱ्या सिमेंट रस्ता आणि बंद गटारांचे चेंबरची उंची वाढवू नका, या मागणीचे निवेदन शहरवासीयांनी आज प्रशासकीय अधिकारी डॉ.अमोल जाधव यांना दिले. निवेदितील संभ्रम दूर करा आणि बांधकामाचा शहरवासीयांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन विकासकामे करा अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरात नगरपंचायत अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी लक्ष रुपयांचे विकास कामे सुरू आहेत. बंद गटारे आणि सिमेंट रस्ते यांचा विकास कामात समावेश आहे. रेल्वे फाटक ते अर्बन बँक चौक दरम्यान सिमेंट रस्ता मंजूर आहे. या रस्त्याचे काम जुन्या रस्त्याचे खोदकाम करून होणार आहे. मात्र पालीवाल ते अर्बन बँक चौक या रस्त्याचे खोदकाम न करता जुन्या रस्त्यावर सिमेंट रस्ता बांधकाम होणार आहे. निविदेमध्ये अशी तरतूद असल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये आहे.

जुना रस्ता खोदकाम न करता नवीन रस्ता तयार झाल्यास रस्त्याची उंची वाढेल. परिणामी लगतच्या घरांच्या पायापेक्षा रस्ता उंच होऊन परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी जाईल. या संभ्रमावस्थेमुळे आज परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी या संदर्भात स्थापत्य अभियंता आणि मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. संबंधितांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी मयंक जयस्वाल, पारस चंदेल, महेश पसीने, शशांक जैस्वाल, प्रकाश पालीवाल, अविनाश नाकाडे, हरीश जोक्यानी, उमेश राजाभोज आणि नागरिक उपस्थित होते.