‘कातुर्ली वॉरियर्स’ करणार अभ्यागतांचे स्वागत

0
35

भव्य प्रवेशद्वारातून सैनिकांची कृतज्ञता : पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव

गोंदिया- गेल्या 30 वर्षांत आमगाव तालुक्यातील कातुर्ली या गावाने देश सेवेसाठी 35 शूर जवान दिले. या जवानांनी देखील आता गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजालाही काही देणं लागते, या भावनेतून गाव विकासात हातभार लावण्यास सुरूवात केली. गावाच्या सुरुवातीलाच एक भव्यदिव्य अशा प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे स्वागत ‘कातुर्ली वॉरियर्स’ रेखाटलेल्या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन रविवारी थाटात पार पडले.

आमगाव तालुक्यातील कातुर्ली हे गाव सैनिकांचे गाव म्हणून जिल्ह्यात नावारूपास आले आहेत. अगदीच अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने देश सेवेसाठी पाच-दहा नव्हे, तब्बल 35 जवान दिले. भारतीय सैन्याच्या विविध दलांमध्ये सामान्य शिपाई ते अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत. आपल्याला ज्या गावाने देशसेवा करण्याची संधी दिली. तिथपर्यंत जाण्यासाठी गावातील संसाधनांचा आपण वापर केला. त्या गावाला आता परतफेड करण्याची वेळ आली आहे, असा विचार आता कातुर्ली वॉरियर्स ग्रुपने केला आहे. त्याकरिता त्यांनी एकत्र येत कातुर्ली वॉरियर्स सैनिक समितीचे गठण केले. समितीने गावात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार आपल्यातर्फे बांधून देण्याचा संकल्प गावातील जवानांनी केला आहे. पैसे गोळा करून या कामाला मूर्तरूप देण्याचे काम देखील सुरू झाले आहे. त्यासाठी रविवारी (ता. 2) कातुर्ली येथे ‘कातुर्ली वॉरियर्स सैनिक प्रवेशद्वार’ बांधकामाचा भूमिपूजन सोहळा देखील थाटात पार पडला. कातुर्ली वॉरियर्स सैनिक समितीचे अध्यक्ष प्रेमलाल पटले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच केशरीचंद बिसेन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून जि. प. सदस्य किशोर महारवाडे आणि प्रमुख अतिथी म्हणून यावेळी गावातील आठ माजी सैनिक, चार कार्यरत सैनिक तसेच गावातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. संचालन समितीचे कोशाध्यक्ष माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले. प्रवेशद्वाराचे बांधकाम येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. त्यानंतर या गावात प्रवेश करताच कातुर्ली वॉरियर्स लिहिलेले द्वार गावात येणाऱ्यांचे स्वागत करणार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुंच्या खांबांवर आत्तापर्यंत असलेल्या सैनिकांची नावे लिहिली जाणार असून यापुढे देखील सैन्यात जाणाऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. कातुर्ली गावात भारतीय सैन्यात असलेल्या जवान राबवित असलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतूक करण्यात येत आहे.

भविष्यात अनेक योजना

कातुर्ली येथील जवानांनी गाव विकासात हातभार लावण्याचा चंग बांधला आहे. पहिले पाऊल म्हणून प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे. त्यानंतर गावात शिक्षण, आरोग्य या बाबींसाठी देखील प्रयत्न करून ते फळास लावण्याचा मानस कातुर्ली वॉरियर्सने वर्तविला आहे. गावात माजी सैनिक वाचनालय देखील उभारण्यात येणार आहे. प्रत्येक सैनिक आपल्या वाढदिवसाला एक पुस्तक वाचनालयाला भेट देवून एक रोपटे देखील लावणार आहे. त्याचप्रकारे प्रत्येक महिन्यात गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून ग्राम पंचायत परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. असेच समाजाचे ऋण प्रत्येकाने फेडल्यास गावांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.